धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 18:04 IST2025-09-13T17:55:36+5:302025-09-13T18:04:02+5:30
Zoya Thomas Lobo : झोयाने कठोर परिश्रम आणि टॅलेंटने फोटो जर्नलिझमच्या जगात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.

झोया थॉमस लोबो ही देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट आहे. झोयाने कठोर परिश्रम आणि टॅलेंटने फोटो जर्नलिझमच्या जगात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आणि देशातील इतर ट्रान्सजेंडरसाठी प्रेरणादायी ठरली.
कोरोना महामारीच्या काळात प्रसिद्ध झालेली झोया आता पुन्हा एकदा संकटांचा सामना करत आहे, परंतु या संकटात तिच्या आशा अजूनही कायम आहेत. तिची स्वप्नं मोठी आहेत.
झोयाचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. कठोर परिश्रम आणि आवडीमुळे तिने फोटो जर्नलिझमच्या जगात प्रवेश केला आणि लवकरच तिला गुगल, एचएसबीसी आणि केबीब्यूटी सारख्या मोठ्या कंपन्यांकडून असाइनमेंट्स मिळाल्या.
एका टीव्ही न्यूज चॅनेलमध्येही काम केलं, परंतु जसजसा काळ गेला तसतशा त्या संधी तिच्या हातातून निसटल्या. आज झोयाला काम मिळत नाहीय आणि त्यामुळेच तिला मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये भीक मागावी लागत आहे.
सध्या झोया मुंबईतील वांद्रे परिसरातील एका झोपडपट्टीत भाड्याने राहते. झोयासाठी हा काळ खूप कठीण आहे, कारण एक काळ असा होता जेव्हा ती मोठ्या ब्रँड आणि कंपन्यांमध्ये काम करायची.
एक ट्रान्सजेंडर असल्याने झोयाला आधीच समाजात भेदभावाचा सामना करावा लागत होता आणि आता तिला व्यावसायिक जगातही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
झोयाने एनबीटीला सांगितलं की, माझ्या खोलीचं भाडं ४००० रुपये आहे. वीज आणि पाण्याचे बिल, रेशन खर्च देखील आहे. मला कोणतंही काम मिळत नाही, म्हणून मी लोकल ट्रेनमध्ये भीक मागत आहे. अनेक अडचणी आहेत, पण मी हार मानलेली नाही.
झोयाने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती, परंतु आता ती अशा संधी शोधत आहे ज्यामुळे तिला पुन्हा एकदा समाजात आदर मिळेल. झोयाचा संघर्ष अजून संपलेला नाही. ती या कठीण काळातून जाण्याचा प्रयत्न करत आहे.
झोयाला आशा आहे की, समाज तिचा संघर्ष समजून घेईल आणि तिला ती पूर्णपणे पात्र असलेली संधी मिळेल. झोया म्हणाली की, "मला अजूनही आशा आहे की कलेद्वारे आदर मिळेल."
"मला एक उत्तम फोटो काढायचा आहे आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट द्यायचा आहे. कदाचित त्यांना माझं काम आवडेल आणि मला त्यांच्याद्वारे कामाची चांगली संधी मिळेल."
"आपल्या वेगाने विकसित होणाऱ्या देशात ट्रान्सजेंडर्सना अजूनही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. काही महिन्यांपूर्वी एका पत्रकाराने मला मुलाखतीसाठी एका कॉफी शॉपमध्ये बोलावलं, मी तिथे पोहोचताच, तिथल्या गार्डने मला आत जाऊ दिलं नाही, कारण मी ट्रान्सजेंडर आहे."
"मला त्या पत्रकाराला आत जाण्यासाठी बोलावावं लागले. मला बॉलिवूड सेलिब्रिटींचे फोटोग्राफी करायची आहे, पण यादरम्यान माझ्यासोबत अशा काही घटना घडल्या, जिथे काही नवीन फोटोग्राफर्सनी माझ्यावर काही विचित्र कमेंट केल्या आणि माझी चेष्टा केली."
"या घटना जरी खूप निराशाजनक आहेत, तरी असे अनेक सीनियर फोटोग्राफर्स आहेत जे खूप चांगले आहेत आणि मला मदत करतात. रोजचा संघर्ष हा नवीन असतो पण मी हार मानलेली नाही."