Maghi Ganpati 2026 : उकडीचे मोदक फुटतात, सारण बाहेर येते? पाहा तांदळाचं पीठ परफेक्ट होण्यासाठी ५ टिप्स, मोदक होतील पांढरेशुभ्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2026 19:00 IST2026-01-21T19:00:00+5:302026-01-21T19:00:02+5:30

Maghi Ganpati 2026: Ukadiche Modak tips: modak recipe: तांदळाची पिठी तयार करताना ५ टिप्स लक्षात ठेवा.

माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी उकडीचे मोदक केले जातात. बाप्पाला उकडीचे मोदक फार आवडतात. पण अनेकदा मोदकाचे पीठ न जमल्यामुळे ते वळताना तुटतात, कळ्या नीट पडत नाहीत किंवा वाफवल्यानंतर सारण बाहेर येते. (Ukadiche Modak tips)

आपल्याला कळीदार, पांढरशुभ्र आणि कापसासारखे मऊसुत मोदक बनवायचे असतील, तर तांदळाची पिठी तयार करताना ५ टिप्स लक्षात ठेवा. ( modak recipe)

उकडीचे मोदक करताना तांदळू हा जुना असावा, आंबेमोहोर घेतल्यास मोदक मऊसूत होतो. तांदूळ स्वच्छ धुवून, पाणी निथळून तांदूळ ७ ते ८ तास कोरडा करुन घ्यावा.

तांदूळ व्यवस्थित सुकल्यावरच बारीक दळून घ्या. तांदूळ उन्हामध्ये सुकवू नका. तो जास्त कोरडा झाल्यास मोदकाला चिरा पडतात किंवा कळ्या नीट येत नाही. त्यासाठी तांदूळ हा फॅन खाली सुकवावा.

उकडीचे पीठ तयार करताना पाणी आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात घ्यावे. पाण्यात मीठ आणि तूप घातल्यानंतर चांगली उकळी आल्यावर गॅस मंद आचेवर करा. यानंतर त्यात तांदळाचे पीठ घाला.

पीठ व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करुन १० ते १५ मिनिटे झाकून ठेवा. पीठ गरम असतानाच १० ते १५ मिनिटे मळून घ्या.

पीठ थोडे कोरडे वाटत असेल तर कोमट पाण्याचा हात लावून मळा. आणि मग पारी करुन कळीदार, सुबक मोदक तयार करा.