कियारा अडवाणीच्या ड्रेसवरचे दोन ‘Bravehearts’, पोटातल्या बाळासोबतची खास गोष्ट सांगत केला रॅम्प वॉक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 17:44 IST2025-05-06T17:39:35+5:302025-05-06T17:44:40+5:30

MET GALA 2025 या फॅशन वर्ल्डमधल्या अतिशय दिमाखदार सोहळ्यात कियारा अडवाणीची एन्ट्री अतिशय धमाकेदार ठरली. सोनेरी आणि काळ्या या दोन रंगांचे सुंदर कॉम्बिनेशन असणारा तिचा ड्रेस तर चर्चेचा विषय ठरलाच.. पण त्यापेक्षाही जास्त चर्चा झाली ती तिच्या ड्रेसवरच्या ‘Bravehearts’ ची..

आपल्याला माहितीच आहे की कियारा सध्या गरोदर आहे. काही वर्षांपुर्वीचा काळ असा होता की अभिनेत्रींना त्यांनी केलेली लग्नंही लपवून ठेवावी लागायची. कारण त्याचा त्यांच्या करिअरवर वाईट परिणाम व्हायचा. मग अशावेळी मुलं होणं तर खूपच दूरची गोष्ट.. मुलंबाळं झाल्यानंतर अभिनेत्रींचं ग्लॅमर आपोआपच कमी होऊन जायचं..

पण सध्याचा काळ मात्र बदलला आहे. लग्न झाल्यानंतर तर करिअरवर त्याचा काहीच वाईट परिणाम होत नाही, उलट मुलं झाल्यानंतरही करिअर त्याच फॉर्ममध्ये सुरू ठेवता येतं हेच आताच्या करिना कपूर, आलिया भट या अभिनेत्रींकडे पाहून दिसून येतं. आता कियाराने आणखी एक पाऊल पुढे टाकलं असून ती तिचं मातृत्व थेट MET GALA सोहळ्यात मिरवून आली आहे.

यावेळी तिने जो ड्रेस घातला होता तो फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाईन केला असून तो अतिशय वेगळी गोष्ट सांगणारा होता.

या ड्रेसवर दोन हृदये आहेत. एक मोठं म्हणजे आईचं हृदय आणि तिच्या पोटावर असणारं लहानसं बाळाचं हृदय. हे दोन्ही हार्ट घुंगरू, स्टोन, मोती लावलेल्या साखळीने जोडलेली आहेत. आई आणि तिचं बाळ यांच्यातलं हळवं नातंच या ड्रेसमधून गौरव गुप्ता यांनी दाखवून दिलं आहे. याच दोन हृदयांना त्यांनी ‘Bravehearts’ म्हणून संबोधलं..

कियारा या ड्रेसमध्ये कशी दिसली, तिचा मेकअप कसा होता, तिचा ड्रेस कसा होता या गोष्टींपेक्षाही जास्त चर्चा होत आहे ती तिच्या ड्रेसमधून तिने सांगितलेल्या तिच्या बाळाच्या नाजुक गोष्टीची आणि मातृत्वाला किती सुंदर पद्धतीने तिने जगापुढे आणलं याची...