स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:17 IST2025-05-08T18:11:12+5:302025-05-08T18:17:23+5:30

IAS Anjali Garg : मेडिकल करियरमधून नागरी सेवेत प्रवेश केलेल्या आणि अनेक आव्हानांवर मात करून आयएएस अधिकारी बनलेल्या डॉ. अंजली गर्गपासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

एमबीबीएससाठी भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली नीट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अशाच एका ध्येयवेड्या तरुणीची कौतुकास्पद कामगिरी आता समोर आली आहे. जिने केवळ NEET परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर MBBS दरम्यान UPSC ची तयारी देखील केली.

मेडिकल करियरमधून नागरी सेवेत प्रवेश केलेल्या आणि अनेक आव्हानांवर मात करून आयएएस अधिकारी बनलेल्या डॉ. अंजली गर्गपासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

अंजली गर्गचा जन्म १४ सप्टेंबर १९९६ रोजी चंदीगड येथे झाला. तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. ती एका व्यावसायिक कुटुंबातून आली होती ज्यांचा नागरी सेवेशी काहीही संबंध नव्हता. तरीही, अंजलीने मोठं स्वप्न पाहणं सुरूचं ठेवलं.

अंजलीचं शिक्षण चंदीगडमध्ये सुरू झाले. ती अभ्यासात खूप चांगली होती. बारावीच्या परीक्षेत ९६% गुण मिळवले. बारावीत चमकदार कामगिरी केल्यानंतर आणि नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिला दिल्लीतील व्हीएमएमसी आणि सफदरजंग हॉस्पिटलमधून एमबीबीएस करण्याची संधी मिळाली.

एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात अंजलीचा दृष्टिकोन बदलला. स्थानिक पातळीवर वैद्यकीय सुविधांमधील कमतरता जाणवल्या. तिला असं वाटलं की, तिने व्यापक सामाजिक बदलांमध्ये योगदान द्यावं आणि नागरी सेवा क्षेत्र हे यासाठी एक चांगलं माध्यम होतं.

अंजलीसाठी वैद्यकीय क्षेत्रातून नागरी सेवेत जाणं सोपं नव्हतं. मेडिकल बॅकग्राऊंड असल्याने सुरुवातीला तिला नागरी सेवा अभ्यासक्रमाच्या मूलभूत गोष्टी समजून घेण्यात अडचण येत होती.

कोरोना महामारीच्या काळात यूपीएससी परीक्षेतील पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. अंजलीने २०२२ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि ७९ वा रँक मिळवला आणि आयएएस अधिकारी झाली.

मेडिकल सायन्स हा ऑप्शनल विषय म्हणून निवडला आणि त्यात उत्तम कामगिरी केली. UPSC CSE म्हणजेच नागरी सेवा परीक्षा २०२२ मध्ये या विषयात टॉप केलं.

यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना अंजलीने तिची मेडिकल इंटर्नशिप सुरू ठेवली. रुग्णालयातील १२ तास काम, करोल बागेतील कोचिंग क्लासेस, सेल्फ स्टडी आणि सोशल लाईफ या सर्व गोष्टी सांभाळून यश मिळवलं.