कुंडीतल्या रोपांना विकतच्या खताची गरजच पडणार नाही, घ्या घरगुती उपाय- रोपांच्या सगळ्या तक्रारी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2026 13:00 IST2026-04-01T12:53:02+5:302026-04-01T13:00:11+5:30

कुंडीतली रोपं चांगली वाढावी म्हणून अनेक जण त्यांना विकतची महागडी खतं देतात. पण तरीही रोपांच्या वाढीमध्ये खूप फरक पडेलच असं सांगता येत नाही.

म्हणूनच हे काही साधे सोपे उपाय पाहा. हे उपाय महिन्यातून एकदा केले तरी चालतील (how to make fertilizers for plants?). पण त्यातून रोपांना खूप पोषण मिळेल. त्यांची चांगली वाढ होईल. फुलं भरपूर येऊन रोपं नेहमीच टवटवीत राहतील. शिवाय त्यांच्यावर रोगही पडणार नाही. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहुया..(home remedies for the fast growth of plants)

सगळ्यात पहिला उपाय म्हणजे केळीची सालं. त्यांचे बारीक तुकडे करा. त्यानंतर २ ते ३ दिवस ते तुकडे २ लीटर पाण्यात भिजत घाला. यानंतर पाणी गाळून घ्या. त्यामध्ये तेवढंच साधं पाणी टाका आणि हे पाणी १० ते १५ दिवसांतून एकदा कुंडीतल्या रोपांना द्या. रोपांना भरपूर फुलं येतील.

कुंडीतली माती नेहमीच चांगली कसदार राहावी यासाठी ५० ग्रॅम गूळ १ लीटर पाण्यात मिसळा. २४ तास हे मिश्रण तसंच ठेवा. त्यानंतर ते गाळून घ्या आणि त्यात तेवढ्याच प्रमाणात साधं पाणी घाला. हे पाणी महिन्यातून एकदा कुंडीतल्या रोपांना घाला.

कांद्याची आणि बटाट्याची टरफलं एकत्र करून बादलीमध्ये घाला. त्यात ती बुडतील एवढं पाणी घाला. २ दिवस हे मिश्रण झाकून ठेवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि त्यात त्याच्या दुप्पट साधं पाणी घालून ते १५ दिवसांतून एकदा रोपांना द्या. कांद्यातलं सल्फर आणि बटाट्यामधलं पोटॅशियम रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतं.

१ लीटर पाण्यात १ टीस्पून एप्सम सॉल्ट घाला. हे पाणी महिन्यातून एकदा रोपांवर शिंपडा. यामुळे रोपं छान हिरवीगार राहतात आणि त्यांच्यावर रोग पडत नाही.

तांदूळ धुतल्यानंतरचं जे पाणी असतं ते टाकून देऊ नका. कुंडीतल्या रोपांना द्या. त्यामुळेही रोपांची चांगली वाढ होण्यास मदत होते.