आंबे नेहमी आंबटच निघतात? खरेदी करताना ३ टिप्स लक्षात ठेवा- आंबा गोड, रसाळ निघेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2025 09:25 IST2025-05-16T09:18:19+5:302025-05-16T09:25:01+5:30

आपण मोठ्या हौशीने बाजारातून आंबे खरेदी करून आणतो. घरी आणल्यानंतर मोठ्या उत्साहाने आंबे खायला बसतो. पण नेमकं असं होतं की आपण खात असलेला आंबा अतिशय आंबट निघतो.

व्यवस्थित पाहून, तपासून आपण आंब्याची खरेदी केलेली असते. पण तरीही आंब्याची निवड चुकते आणि मग त्याच्या आंबटपणामुळे आपली आंबे खाण्याची मजाच निघून जाते. शिवाय पैसे वाया जातात तो भाग वेगळाच..

म्हणूनच आंबा खरेदी करताना काही गोष्टी व्यवस्थित तपासून घ्या. जेणेकरून तुम्ही घेतलेले आंबे अतिशय गोड, रसाळ आणि नैसर्गिकपणे पिकलेले निघतील.

गोड आंब्यांची पारख कशी करावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ nisargamitra_farm या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आलेली पहिली गोष्ट म्हणजे आंब्याच्या देठाजवळच्या भागाकडे लक्ष द्या. ज्या आंब्याचा देठाकडचा भाग थोडा दबलेला असतो तो आंबा पिकलेला असतो. ज्या आंब्याचा भाग दबलेला नसतो तो आंबा अजून पिकायचा असतो.

यानंतर आंब्याला स्पर्श करून पाहा. जो आंबा थोडा मऊ झालेला असेल तो आंबा पिकलेला असतो.

जो आंबा पिकलेला असतो त्याला स्ट्राँग सुगंध असतो. त्यामुळे आंबा खरेदी करण्यापुर्वी निश्चितच त्याचा सुगंध घेऊन पाहा. ज्या आंब्याला सुगंध नसतो, तो आंबा घेणे टाळा.