Narayan Rane vs Shivsena: शिवसेनेचा नवा आक्रमक चेहरा, नारायण राणेविरुद्ध संघर्षात युवा वरुण सरदेसाईंचं नेतृत्व झळकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 15:56 IST2021-08-24T15:43:48+5:302021-08-24T15:56:04+5:30
Varun Sardesai:

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी संतप्त पवित्रा घेतला. ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. राणे यांच्यावरील संतापाच्या भरात शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयं फोडली.
नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांचा संघर्ष हा नवीन नाही. परंतु सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच शिवसेनेचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्याआधी शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्यांच्याविरोधात बोललेलं सहन करणार नाही अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली.
राणेविरोधातील या संघर्षात शिवसैनिकांसोबत युवासेनेचे कार्यकर्त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसला. युवासेनेची स्थापना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवतीर्थावर केली होती. या युवासेनेची धुरा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हातात आहे.
परंतु युवासेनेचा दुसरा चेहरा म्हणजे सचिव वरुण सरदेसाई राणे संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रखरतेने समोर आलेले नेतृत्व आहे. युवासेना संवाद मेळाव्याच्या माध्यमातून वरुण सरदेसाई यांनी राज्यभरात युवा कार्यकर्त्यांची फौज उभारली आहे.
युवासेनेची धुरा वरुण सरदेसाई यांच्या हाती जाणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यातच नारायण राणे यांच्या निमित्ताने वरुण सरदेसाई यांचं आक्रमक नेतृत्व धडाडीनं समोर आलं. थेट जुहू येथील नारायण राणे यांच्या बंगल्यावर युवासेनेने मोर्चा काढला.
वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात निघालेला मोर्चा लक्षवेधी ठरला आहे. त्यानिमित्ताने वरुण सरदेसाई यांच्या रुपाने शिवसेनेला नवं आक्रमक नेतृत्व मिळालं आहे. वरुण सरदेसाई यांनी जुहू येथील आंदोलनात नारायण राणे कुटुंबाला अंगावर घेण्याचं काम केलं त्यामुळे निश्चितच आगामी भविष्यकाळात वरुण सरदेसाई शिवसेनेचा चेहरा म्हणून पुढे येतील यात शंका नाही.
वरुण सरदेसाई हे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आहेत. म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत. वरुण सरदेसाई यांच्याकडे शिवसेनेच्या युवासेनेची सचिवपदाची जबाबदारी आहे. तसेच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण सरदेसाई यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी वरुण सरदेसाईंवर आरोप लावले होते. नितेश राणे म्हणाले होते की, गेल्या वर्षी आयपीएल खेळलं गेलं. त्या टुर्नामेंटअगोदर बेटिंगचं रॅकेट मुंबईत चालतं. काही लोक फ्लॅटमध्ये, हॉटेलमधून करतात. या सगळ्या बेटिंगवाल्यांना सचिन वाझेचे फोन जातात.
अशी रक्कम मागितली गेल्यावर वाझेंना एका व्यक्तीचा फोन जायचा. तू इतकी रक्कम मागितली आहेस, त्यात आमचे किती, आम्हाला किती देणार असं संभाषण केलं जायचं. ही व्यक्ती कोण? विधिमंडळात मी ज्याचं नाव घेतलं, त्याला वाय प्लस संरक्षण दिलेलं आहे, पालिकेच्या सर्व टेंडरमध्ये ज्याचं नाव आहे अशा वरुण सरदेसाईचं वाझेशी हे संभाषण झालं होतं असा आरोप नितेश राणेंनी केला होता. त्याला वरुण सरदेसाई यांनीही पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं होतं.
त्यानंतर आता पुन्हा वरुण सरदेसाई राणेंविरोधात मैदानात उतरले आहेत. राणेविरोधात आंदोलन करताना वरुण सरदेसाई यांनी युवासेनेच्या कार्यकर्त्याचे आभार मानले. उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत जर त्यांच्याविरुद्ध बोलाल तर गय केली जाणार नाही असा इशाराच वरुण सरदेसाई यांनी थेट नारायण राणे यांच्या बंगल्याबाहेर उभं राहून दिल्याने वरुण चांगलेच चर्चेत आले आहेत.