हायकोर्टानं भारतीय जनता पार्टीला फटकारलं; मुंबई महापालिकेत बसला मोठा फटका

By प्रविण मरगळे | Published: September 21, 2020 08:12 PM2020-09-21T20:12:59+5:302020-09-21T20:17:07+5:30

राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपात यांच्यात संघर्ष वाढला, शिवसेनेने भाजपाची साथ सोडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला. त्यामुळे विधानसभेत सर्वाधिक १०५ आमदार असूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसायला लागलं.

सत्ता हातातून निसटल्यानंतर भाजपाने शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत भाजपाने शिवसेनेची कोंडी करण्याचा डाव आखला. मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेनंतर भाजपाचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत.

परंतु २०१७ च्या निवडणुकीनंतर भाजपाने राज्यात सत्तेत एकत्र असल्याने महापालिकेचे विरोधी पक्षनेते पद स्वीकारलं नाही, त्यामुळे मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या रवी राजा यांच्याकडे गेले. त्यावेळी भाजपानं आम्ही मुंबई महापालिकेत पहारेदाराची भूमिका घेणार असल्याचं सांगितले.

परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाने मुंबई महापालिकेत शिवसेनेची कोंडी करण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदावर दावा ठोकला, महापालिकेत सर्वात जास्त नगरसेवक असल्याने विरोधी पक्षनेतेपद आम्हाला द्यावं अशी याचिका भाजपा नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी मुंबई हायकोर्टात केली होती.

सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने भाजपाला चांगलेच फटकारले. विरोधी पक्षनेत्यासारखं महत्त्वाचं पद एखाद्या व्यक्ती किंवा पक्षाच्या लहरीप्रमाणे बदलणं कायद्यात बसत नाही असं सांगत हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

काँग्रेस नेते रवी राजा यांची नेमणूक करताना मुंबईच्या महापौरांनी कुठेही सत्तेची मर्यादा ओलांडली नाही किंवा बेकायदेशीरपणे सत्तेचा गैरवापर केला नाही. २०१७ मध्ये विरोधी पक्षनेते पद भाजपाने स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता पक्षाचा विचार बदलला आहे म्हणून २०२० मध्ये हे पद भाजपाला देण्यास हायकोर्टाने नकार दिला.

ज्यावेळी महापालिकेकडून विरोधी पक्षनेते पद भाजपाला देण्यात आलं तेव्हा त्यांनी नकार दिला. त्यानंतर महापालिकेतील तिसऱ्या मोठ्या पक्षाला म्हणजे काँग्रेसचे रवी राजा यांना हे पद दिले गेले. कोणी विचार बदलला म्हणून हे पद देता येणार नाही.

कायद्याच्या कक्षेत राहूनच महापौरांनी रवी राजा यांची निवड केली आहे. त्यामुळे यापुढे काँग्रेसचे रवी राजा हेच मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी कायम राहणार असल्याचं हायकोर्टाच्या निकालावरुन स्पष्ट होते.

एप्रिल २०१७ मध्ये रवी राजा यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली, त्याला भाजपाने स्वीकारले, ३ वर्षात कधीही आव्हान दिले नाही. अलीकडेच राज्यातील सत्तेतून भाजपा पायउतार झाल्यानंतर शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपाने मुंबई महापालिकेकडे लक्ष केंद्रीत केले.

२०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाचे ८२ नगरसेवक निवडून आले होते, तर शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते, काँग्रेस ३१, एनसीपी ९ आणि मनसे ७ असं संख्याबळ होतं, त्यातील मनसेचे ६ नगरसेवकांच्या गटाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.