शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उद्धव ठाकरेंना आधी जे जमलं नाही, ते नितीश करून दाखवणार? पहिल्याच झटक्यात भाजप बॅकफूटवर

By कुणाल गवाणकर | Published: January 02, 2021 5:57 PM

1 / 11
गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जात भाजपला धक्का दिला. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिवसेनेला कुचंबणा सहन करावी लागली होती. सेनेच्या वाट्याला कमी आणि दुय्यम मंत्रिपदं आली होती. बिहारमध्ये मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:चे कमी आमदार असूनही जास्त आणि महत्त्वाची मंत्रिपदं मिळवण्याची तयारी सुरू केली आहे.
2 / 11
बिहारमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलानं (जेडीयू) विजय मिळवला. दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन केलं. मात्र अवघ्या दीड महिन्यांतच त्यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या आहेत.
3 / 11
विधानसभा निवडणुकीत भाजपनं मोठी झेप घेत राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला. या निवडणुकीत जेडीयूला मोठा फटका बसला. त्यांच्या आमदारांची संख्या ५० च्या खाली आली.
4 / 11
एनडीएचं सरकार आल्यास नितीश कुमारच मुख्यमंत्री राहतील, अशी घोषणा भाजपनं केली होती. जेडीयूला कमी जागा मिळाल्यानंतरही भाजपनं आपला शब्द पाळला.
5 / 11
जेडीयूच्या जागा कमी झाल्यानं मुख्यमंत्रिपद नितीश यांच्याकडे असलं तरी सरकारवर वर्चस्व आणि वरचष्मा भाजपचा असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पहिल्याच महिन्यात ही शक्यता खरी ठरली.
6 / 11
बिहारमध्ये जेडीयूसोबत सत्तेत असलेल्या भाजपनं अरुणाचल प्रदेशात धक्का दिला. भाजपनं जेडीयूचे सातपैकी सहा आमदार फोडले. यानंतर नितीश यांनी भाजपबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
7 / 11
मुख्यमंत्रिपदाची लालसा नाही, एनडीएनं हवं त्याला मुख्यमंत्री करावं, अशी भूमिका नितीश यांनी घेतली. यानंतर लगेचच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानं नितीश यांना आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न केले.
8 / 11
नितीश यांनी महागठबंधनमध्ये यावं यासाठी राजदचे प्रयत्न सुरू आहेत. तसं घडल्यास भाजपच्या हातून बिहार जाऊ शकतं. त्यामुळे भाजप आता बॅकफूटवर गेला आहे.
9 / 11
बिहारमधील एनडीएचं सरकार पाच वर्षे चालावं अशी जेडीयू आणि भाजपची इच्छा आहे. नितीश पुन्हा महागठबंधनकडे जाणार नाहीत, असा विश्वास भाजपचे खासदार अजय निषाद यांनी व्यक्त केला.
10 / 11
बिहार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जेडीयूला महत्त्वाचं स्थान मिळेल, असे संकेतदेखील निषाद यांनी दिले. सर्वात मोठा पक्ष असतानाही आम्ही मुख्यमंत्रिपद जेडीयूला दिलं. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे कमी मंत्री असल्यासही आम्हाला अडचण नाही, असं निषाद म्हणाले.
11 / 11
महाराष्ट्रात २०१४-२०१९ दरम्यान शिवसेना-भाजपचं सरकार असताना शिवसेनेला कमी आणि दुय्यम मंत्रिपदं देण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेकदा नाराजी व्यक्त करूनही परिस्थिती बदलली नव्हती. मात्र नितीश यांनी पहिल्याच झटक्यात भाजपला बॅकफूटवर ढकलल्याचं दिसत आहे. याचा फायदा त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावेळी होऊ शकतो.
टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारUddhav Thackerayउद्धव ठाकरेJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाShiv Senaशिवसेना