होऊ दे चर्चा! एकनाथ खडसेंसोबत पुण्यातील प्रसिद्ध 'गोल्डमॅन'ही करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Published: October 23, 2020 11:46 AM2020-10-23T11:46:11+5:302020-10-23T11:49:53+5:30

तब्बल ४० वर्षानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.

एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते, त्याचसोबत ओबीसी समाजाचे नेते म्हणूनही एकनाथ खडसे प्रसिद्ध होते, त्यामुळे एकनाथ खडसेंच्या जाण्याने भाजपाला कितपत फटका बसणार हे आगामी काळात कळेल तुर्तास खडसेंसोबत राष्ट्रवादीत कोण प्रवेश करणार याचीच चर्चा आहे.

एकनाथ खडसेंसोबत जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्याचसोबत काही माजी आमदारही भाजपाला राम राम करत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार आहेत.

एकनाथ खडसेंसोबत कोणीही जाणार नाही असा दावा भाजपा नेते करत आहेत, पण १०-१२ आमदार माझ्या संपर्कात आहेत असं खडसेंनी सांगितले आहे. सध्यातरी एकनाथ खडसेंसोबत आज राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये एका गोल्डमॅनची प्रचंड चर्चा आहे.

खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील एका गोल्डमॅनची चर्चा सोशल मीडियात सुरु आहे, या गोल्डमॅनचं नाव आहे प्रशांत सकपाळ, कोट्यवधीचं सोनं अंगावर परिधान करुन आजूबाजूला ५-६ बाऊन्सर्सचा गराडा असलेले प्रशांत सकपाळ पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश करणार आहे.

एकनाथ खडसे आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्याचवेळी प्रशांत सकपाळ हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, गेल्या २-३ दिवसांपासून राष्ट्रवादी नेत्यांशी संपर्कात आहे, त्यामुळे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.

पक्षात प्रवेश केल्यानंतर जबाबादारी काय द्यायची हे नेतृत्व ठरवतील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे या नेत्यांच्या संपर्कात असल्याने आज शरद पवारांच्या उपस्थितीत प्रक्षप्रवेश करणार असल्याचं प्रशांत सकपाळ यांनी सांगितले आहे.

प्रशांत सकपाळ हे प्रसिद्ध गोल्डमॅन असून व्यवसायाने ते बिल्डर आहेत, सोने घालण्याची हौस इतकी की तब्बल ५ किलो सोनं त्यांच्या अंगावर आहे. पायातील बुटांपासून ते कपड्यांपर्यंत सोनं आहे. मी माझ्या मेहनतीच्या पैशातून सोनं खरेदी केल्याचं प्रशांत सकपाळ सांगतात.

प्रशांतचे बूटही सोन्याचे आहेत. घड्याळ सोन्याचं घालतात. गळ्यात सोन्याच्या मोठमोठ्या चैनी आहेत. हाताच्या पाचही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्या फोनवरुन ते संवाद साधतात त्याला सोन्याच कव्हर लावलेले आहे.

अंगावर कोट्यवधीचं सोनं असल्याने प्रशांत सकपाळ यांच्या सुरक्षेसाठी ८ बाऊन्सर तैनात असतात. गायक बप्पी लहरी यांच्या गाण्याचे ते शौकीन आहेत, बप्पी लहरी हेदेखील सोने परिधान करतात. तब्बल दीड कोटींचे सोनं घालून ते फिरत असतात.