"तुला पाहते रे...फ्रेम"मुळं रंगली ग्रँडस्लॅम स्पर्धेतील 'राजा-राणी'मध्ये प्रेम फुलत असल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 19:34 IST2025-06-30T19:19:50+5:302025-06-30T19:34:50+5:30

ही जोडी आगामी अमेरिकन ओपन स्पर्धेत एकत्र खेळताना दिसणार आहे.

विम्बल्डन आधी ग्रँडस्लॅम स्पर्धेत अधिराज्य गाजवणारा नवा चेहरा कार्लोस अल्काराझ आणि ग्रँड स्लॅम चॅम्पियन एम्मा राडुकानू ही जोडी चांगली लक्षवेधी ठरत आहे.

आगामी अमेरिकन ओपन स्पर्धेत एम्मा आणि अल्कराझ ही जोडी मिश्र दुहेरीत एकत्र खेळताना दिसणार आहे. ही बातमी समोर आल्यापासून दोघांमध्ये डेटिंगचा खेळ सुरु असल्याची चर्चा रंगू लागली.

दोघांच्यात 'प्रेम' फुलत असल्याच्या चर्चेमागचं कारण ठरलं ते ब्रिटिश एम्मा राडुकानू हिची 'तुला पाहते रे...' ही फ्रेम. विम्बल्डन आधी एचएसबीसी चॅम्पियनशिप स्पर्धेत ग्रँडस्लॅम चॅम्पियन एम्मा आपल्या टेनिस कोर्टवरील आगामी पार्टनर अल्कराझ याला चीअर करताना स्पॉट झाली होती.

अमेरिकन ओपन २०२५ स्पर्धेत जोडीनं कोर्टवर उतरण्याचा निर्णय घेतल्यापासून ते एकत्र सरावही करताना दिसत आहेत. त्यामुळेच दोघांच्यात कोर्टवरील प्रॉफेशनल पार्टनरशिपशिवाय प्रेमाचा खेळ सुरु असल्याची चर्चा रंगू लागली.

विम्बल्डन स्पर्धेला सुरुवात होण्याआधी पत्रकार परिषदेत ब्रिटिश टेनिस स्टार अन् २०२१ ची अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची चॅम्पियन एम्माला स्पॅनिश टेनिस स्टारसोबतच्या डेटिंगवर प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी तिने कार्लोस अल्काराझसोबत डेटिंगसंदर्भात रंगणाऱ्या चर्चा या फक्त अफवा असल्याचे म्हटले आहे. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत, असे सांगत तिने पत्रकार परिषदेची सांगता केली.

यंदाच्या अमेरिकन ओपन स्पर्धेत मिश्र दुहेरीत खेळण्यासंदर्भात कोर्लोस अल्कराझनं प्रस्ताव ठेवला अन् त्याला मी लगेच होकार दिला, ही गोष्ट सांगत आम्ही एकत्र सरावही सुरु केल्याचे ती म्हणाली आहे.