Tokyo Olympics: बांबूच्या काठीने सराव ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास; भारताच्या तलवारबाज भवानी देवीची ऐतिहासिक कामगिरी, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:35 PM2021-07-26T12:35:55+5:302021-07-26T12:42:30+5:30

1896 ते 2016 या ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश करण्यात आलेल्या 10 आधुनिक खेळापैकी तलवारबाजी हा एक खेळ आहे... ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिनं पटकावला अन् आज तिनं पहिला सामना जिंकून स्वप्नवत सुरूवात केली. CA Bhavani Devi

1896 ते 2016 या ऑलिम्पिक स्पर्धेत समावेश करण्यात आलेल्या 10 आधुनिक खेळापैकी तलवारबाजी हा एक खेळ आहे... ऑलिम्पिक स्पर्धेत तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी पहिल्या खेळाडूचा मान चेन्नईच्या सीए भवानी देवी हिनं पटकावला अन् आज तिनं पहिला सामना जिंकून स्वप्नवत सुरूवात केली.

दुसऱ्या सामन्यात तिला पराभव पत्करावा लागल्यानं ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न भंगले. मात्र, हा शेवट नसून ही सुरूवात आहे... असा मनाशी पक्का निर्धार करून तिनं पुढील फ्रान्समध्ये ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले आहे. आजच्या पराभवानंतर भवानी देवीनं भारतीयांची माफी मागितली. तिनं भावनिक पोस्ट लिहिली आहे.

Chadalavada Anandha Sundhararaman Bhavani Devi हे तिचे पूर्ण नाव... वयाच्या 12व्या वर्षी तिनं चेन्नईत पार पडलेल्या सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत तलवारबाजीत सुवर्णपदक जिंकले. तामिळनाडूचे हे या क्रीडा प्रकारातील पहिलेच पदक होते. बांबूच्या काठीपासून तिनं तलवारबाजी करण्यास सुरुवात केली.

संकटाला तोंड देत तिनं आपलं तलवारबाज बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं, अर्थात या सर्व प्रवासात तिच्या कुटुंबीयांची विशेषतः आईची प्रत्येकवेळी खंबीर साथ मिळाली. तलवारबाजी हा खर्चीक खेळ आहे आणि भवानीच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे भवानी बांबुच्या काठीपासून सराव करायची अन् तलवारीचा फक्त स्पर्धेत उपयोग करायची.

भवानीला चिअर करण्यासाठी तिची आईही टोकियोत दाखल झाली आहे..

वयाच्या 14व्या वर्षी तिला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी मिळाली होती, परंतु स्पर्धा ठिकाणी उशीरा पोहोचल्यामुळे तिला ब्लॅक कार्ड दाखवून बाद करण्यात आले. पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा म्हणून ती खूप उत्साहात होती.

आयोजकांनी तिला स्टेडियमसाठी सकाळी 7.30 वाजता निघायचं आहे असे सांगितले. पण, प्रवासात आम्हाला उशीर झाला आणि आयोजकांनी मला बसमध्येच तलवारबाजीचे कपडे घालण्यास सांगितले, असे तिने सांगितले. लाजाळू स्वभावाच्या भवानी देवीनं कसेबसे ते कपडे घातले अन् स्टेडियमवर पोहोचली.

परंतु त्याआधीच तीनवेळा तिच्या नावाची घोषणा झाली अन् तिला बाद ठरवण्यात आले. त्यानंतर ती संपूर्ण दिवस रडली होती. अशा अनेक वाईट अनुभवांतून भवानी देवी शिकत गेली अन् आज ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली.

भवानीला दुसऱ्याच सामन्यात रिओ ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्तंय प्रवेश करणाऱ्या ब्रुनेटचा सामना करावा लागला आणि तिनं 15-7 अशा फरकानं भारतीय खेळाडूला पराभूत केले. याआधी सलामीच्या सामन्यात ट्युनिशियाच्या नादिया बेन अजीजीला भवानी देवीनं 15-3 असे पराभूत केले.

स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी भवानी देवीनं फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकासाठी आणखी जोर लावेन असा संकल्प केला. तिनं लिहिले की,''आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याची उत्सुकता होती आणि त्याचवेळी भावनाही दाटून आल्या होत्या. पराभवामुळे दुःखी झाले आहे, पण खचले नक्कीच नाही. मी माझ्याकडून सर्वतोपरी झोकून खेळले, परंतु विजय मिळवू शकले नाही. मला माफ करा...'

''प्रत्येक शेवट हा नव्या प्रवासाची सुरुवात असतो. मी अजून मेहनत घेईन आणि पुढील ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावून देशाचा तिरंगा फडकवेन. माझे कोच, सहाय्यक प्रशिक्षक आणि मला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाचे आभार,'' असेही तिनं लिहिले.

Read in English