Ironman Tallinn 2022 : आव्हानांचा सामना करून पार केली ट्रायथलॉन स्पर्धा; औरंगाबादच्या केदार रावनगावेंनी केला अनुभव कथन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 01:54 PM2022-08-17T13:54:50+5:302022-08-17T13:58:10+5:30

इस्टोनियाच्या राजधानीत Ironman Tallinn हा ट्रायथलॉनचा मोठा महोत्सव नुकताच पार पडला. ऐतिहासिक शहर असलेल्या टॅलिनच्या जुन्या शहरापासून ते हार्जू या निसर्गरम्य शहरात हा महोत्सव पार पडला.

इस्टोनियाच्या राजधानीत Ironman Tallinn हा ट्रायथलॉनचा मोठा महोत्सव नुकताच पार पडला. ऐतिहासिक शहर असलेल्या टॅलिनच्या जुन्या शहरापासून ते हार्जू या निसर्गरम्य शहरात हा महोत्सव पार पडला. या ट्रायथलॉन स्पर्धेत औरंगाबादच्या केदार रावनगावे यांनी सहभाग घेतला होता आणि तेथील अनुभव त्यांनी सांगितला.

Ironman Tallian 2022 च्या सायकलिंग क्रीडा प्रकारात सहभागी झालेले केदार रावनगावे.

केदार रावनगावे यांनी सांगितले की, ट्रायथलॉनला खूप डिमांड आहे आणि काम सांभाळून या खेळासाठी तयारी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. धावणे, जलतरण आणि सायकलिंग या तीनही प्रकार तसे माझ्यासाठी नवीन होते. मला या स्पर्धेची तयारी करण्यासाठी ७-८ महिने लागले. कोरोनामुळे स्विमिंग पूल बंद होते आणि ग्रुप सायकलिंग इव्हेंट फार कमी होत होते. औरंगाबादमध्ये तर याचा सराव करणे अधिकच अवघड. सुविधा नाही किंवा प्रशिक्षक नसल्याने हे सोपं नसेल याची जाण मला होती.''

ते पुढे म्हणाले, नितिन घोरपडे जे स्वतः तीन वेळचे आयर्नमॅन आहेत, त्यांचं मार्गदर्शन मला मिळाले. ते नसते तर हा प्रवास अधिक खडतर झाला असता. पहाटे ४.३० वाजता माझ्या सरावाला सुरुवात व्हायची. मी पहाटे ३ वाजता उठायचो आणि ऑफिसमध्ये ८.३० वाजता पोहोचण्यापूर्वी बऱ्याच कॅलरीज बर्न करायचो. आठवड्यातील सहा दिवसांचा हा दिनक्रम ५६ आठवडे सुरु ठेवणे, सोपं नव्हते.

''ही माझी पहिलीच व्यावयसायिक स्पर्धा होती. मी यापूर्वी कोणत्याच व्यावसायिक मॅरेथॉन किंवा ट्रायथलॉनमध्ये सहभाग घेतला नव्हता. आयर्नमॅन शर्यतीत ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकलिंग करणे आणि ४२.२ किलोमीटर पळणे गरजेचे असते. त्यासाठी ग्राऊंड सपोर्ट व न्युट्रीशन एड गरजेची असते. शर्यतीला पहाटे ४ वाजता सुरुवात झाली.

हवामान खराब होते, येलो अलर्टचे वादळ असल्याने तलावात काहीच दिसत नव्हते. त्यामुळे जलतरणाची शर्यत पूर्ण करण्यासाठी ठरवलेल्या वेळेनुसार मला १५ मिनिटे जास्त लागली. सायकलिंगच्या १८० किलोमीटरच्या शर्यतीचा मार्ग संदुर व सुखावणारा होता. पण, त्यानंतर फ्लॅट ट्रॅकवर आव्हान वाढले. ४२.२ किलोमीटर धावण्याची शर्यत अधिक खडतर झाली.

पहिली २१ किलोमीटर चांगली गेली, परंतु पुढची १० किमीचे अंतर आव्हानात्मक झाले. आव्हानांचा सामना केल्यानंतर शर्यत पूर्ण केल्यानंतरचा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. मला रडू आवरले नाही. शेवटची लॅप पूर्ण केल्यानंतर कुटुंबियांनी माझ्यासाठी केलेला त्याग डोळ्यासमोर उभा राहिला. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते.