Shahrukh Khan : 'चक दे इंडिया'... विजयानंतर कबीर खाननं सांगितलं 2 नोव्हेंबरचं 'सुवर्ण' गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 03:09 PM2021-08-02T15:09:25+5:302021-08-02T15:24:49+5:30

देशवासीयांना चक दे इंडिया आठवला मग, चक दे इंडियातील कबिर खानलाही आठवणारचं की. शाहरुख खानने भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयानंतर ट्विट केलं आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिला हॉकी टीमनं इतिहास घडवला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला १-० नं नमवत भारतानं उपांत्य फेरीत धडक दिली. आणखी २ विजय मिळवल्यास भारतीय महिला सुवर्णपदक जिंकतील.

गटात अव्वल असलेला ऑस्ट्रेलियन संघ संपूर्ण जोशात मैदानावर उतरला होता. तर भारताची वाटचाल अडखळत झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं पारडं जड होतं.

मैदानावर भारताच्या पोरींनी शानदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन टीमला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी अनेकदा मिळाली. मात्र, भारतानं जबरदस्त बचाव केला.

भारताच्या विजयानंतर मैदानाच्या अगदी शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. या व्यक्तीचं नाव सोर्ड मारजेन. सोर्ड मारजेन यांनी ४ वर्षांपूर्वी महिला हॉकी संघाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं.

त्यावेळी भारतीय संघ ऑलिम्पिक स्पर्धेतून परतला. भारताला एकाही विजयाची नोंद करता आली नव्हती. संघ मायदेशी दाखल झाल्यानंतर अनेक वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली.

संघ पुन्हा उभा करायचा. मारजेन यांनी हे आव्हान पेललं. आज भारतीय संघानं ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. त्यात मारजेन यांचा मोठा वाटा आहे.

मारजेन १० वर्षे हॉकी खेळले आहेत. महिला टीमच्या आधी त्यांनी पुरुषांच्या टीमलादेखील धडे दिले आहेत. २०१७ मध्ये त्यांच्याकडे महिला संघाची जबाबदारी देण्यात आली.

त्यांच्यापुढे मोठं आव्हान होतं. मारजेन मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. लोकांचा उत्साह वाढवण्याचं काम त्यांना उत्तम जमतं. त्यांच्या याच गुणामुळे भारतीय महिलांचा जोश स्पर्धेत अगदी हाय राहिला.

चक दे इंडियामध्ये शाहरुख खाननं साकारलेला कबीर खान सगळ्यांनी पाहिला. मारजेन यांची कहाणीदेखील फारशी वेगळी नाही. त्यामुळेच, या विजयानंतर देशवासीयांनाही चक दे इंडिया आठवला.

देशवासीयांना चक दे इंडिया आठवला मग, चक दे इंडियातील कबिर खानलाही आठवणारचं की. शाहरुख खानने भारतीय महिला हॉकी संघाच्या विजयानंतर ट्विट केलं आहे.

मारजेन यानं टीम इंडियाचा फोटो ट्विट करत, सॉरी फॅमिली, आय कमिंग अगेन लॅटर... असे म्हटले आहे. शाहरुखने मारजेनचं ट्विट रिट्विट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.

हा, हा, नो प्रॉब्लेम.. येताना फक्त बिलियन्स फॅमिली मेंबर्संसाठी सुवर्ण घेऊन या.... यावेळी धनत्रोदशीसुद्धा 2 नोव्हेंबर रोजीच आहे - माजी कर्णधार कबीर खान, असे ट्विट शाहरुखने केले आहे.

भारतीय महिला संघाच्या विजयाचा शाहरुखनेही आनंद साजरा केला असून, संघाकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा केली आहे. अर्थातच शाहरुखची भूमिका असलेल्या चक दे इंडिया चित्रपटाचा तो सीन साक्षात पाहायला देशवासीयांना अत्यांनंदच होईल.

भारतीय टीम कोणत्याही क्षणी कमजोर पडू नये म्हणून मारजेन यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मारजेन सरावादरम्यान कायम खेळाडूंसोबत मैदानावर असतात.

प्रत्येक खेळाडूसोबतची त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे. खेळाडूंनी त्यांच्या समोर असलेले प्रश्न स्वत: सोडवावेत यासाठी ते प्रयत्नशील असतात. भारतीय महिला टीमच्या खेळात झालेल्या बदलात मारजेन यांचा सिंहाचा वाटा आहे.

मारजे यांनीही शाहरुखचे आभार मानले आहेत, तसेच आपल्या पाठिंबा आणि प्रेमासाठी आभार असे म्हणत, पुन्हा एकदा आम्ही आपलं सर्वस्व पणाला लावू असे मारजे यांनी किंग खानला म्हटलं आहे.