कोरोना लसीकरणाच्या बहाण्यानं आशासेविकेनं केली युवकाची नसबंदी; चौकशीत समोर आला ‘वेगळाच’ ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 08:51 PM2021-07-14T20:51:24+5:302021-07-14T20:58:38+5:30

Corona Vaccination: उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात अजबगजब घटना समोर आली आहे. याठिकाणी कोरोना लसीकरणाच्या नावाखाली नसबंदी केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला.

उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी आशा स्वयंसेविकेने कोरोना लसीकरण करण्याच्या बहाण्याने अविवाहित तरूणाची नसबंदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनात खळबळ माजली आहे.

घडलेल्या प्रकाराची पीडित युवकाच्या कुटुंबीयांना माहिती मिळताच तात्काळ याबाबत त्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखून अवागड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला आहे.

पीडित युवकाचं नाव ध्रुव कुमार असल्याचं सांगितलं जात आहे. ४० वर्षीय ध्रुव कुमार याने आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविकेवर गंभीर आरोप केले आहेत. कोरोना लसीकरणाच्या नावाखाली नसबंदी केल्याचा दावा त्याने केला आहे.

कोरोना लस देणार असल्याचं सांगत फसवून मला घेऊन गेले आणि माझी नसबंदी केली असं युवक म्हणाला. ध्रुव कुमारचा भाऊ अशोक कुमारनं याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत नीलम नावाच्या आशा स्वंयसेविकेवर आरोप लावण्यात आला आहे.

तक्रारीत म्हटलंय की, कोरोना लसीकरण करण्याच्या बहाण्याने नीलम त्यांच्या घरी आली आणि ध्रुवला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेली. त्याठिकाणी फसवणूक करून ध्रुवची नसबंदी केली. अशोक कुमारनं दिलेल्या तक्रारीत आशा कार्यकर्ता नीलम आणि नसबंदी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी थेट कारवाई न करता एटाच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. उमेश कुमार त्रिपाठी यांनी ३ सदस्यीय समिती गठीत करून या घटनेचा तपास केला.

या समितीनं केलेल्या चौकशीनंतर रिपोर्ट सीएमओ यांना पाठवला. आरोग्य विभागाच्या चौकशीत या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. चौकशीनुसार आशा स्वयंसेविका निर्दोष ठरली आहे. ध्रुवची नसबंदी त्याचा भाऊ, वहिनी आणि त्याच्या स्वस्त:च्या सहमतीनं करण्यात आली आहे.

आशा स्वयंसेविका नीलमने सांगितले की, ध्रुव कुमारची वहिनी मिथिलेश आणि भाऊ अशोक कुमार या दोघांच्या मर्जीनेच नसबंदी करण्यात आली. नीलमने सांगितले की, संजू नावाच्या एका दलालाने ध्रुवला आणि त्याच्या कुटुंबीयांना पैशांचे अमिष दाखवले होते.

संजूने सांगितले की, नसबंदी फसवणुकीचा खोटा आरोप लावला तर तुम्हाला लाखो रुपये मिळतील. ११ जुलैला रात्री ९.३० वाजता संजू घरी गेला. त्यानंतर २० हजार घेऊन प्रकरण शांत करण्यासाठी सांगितले. असं न केल्यास जेलमध्ये पाठवण्याची धमकीही दिली

मुख्य आरोग्य अधिकारी म्हणाले की, फसवणूक करून नसबंदी करणं चुकीचं आहे. कारण नसबंदी करण्याअगोदर काऊंन्सलिंग केले जाते. चर्चा होते. चौकशी समिती पीडिताला भेटण्यासाठी विशनपूर गावात गेली असता कुटुंबीयांनी ध्रुव कुमारला लपवून ठेवलं त्याची भेट होऊ दिली नाही.

कुटुंबीयांनी सांगितले की, ध्रुव मूकबधिर आहे. त्याला बोलता आणि ऐकता येत नाही. मात्र गावातील सरपंच आणि अन्य लोकांनी लिखित स्वरुपात ध्रुव कुमारला बोलता येते आणि ऐकायलाही येतं असं चौकशी समितीवर स्पष्ट केले आहे.

Read in English