युवा चेहरा, हिरा व्यापारी...कोण आहे हर्ष सांघवी?; सर्वात कमी वयात भाजपानं दिली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:43 IST2025-10-17T15:38:32+5:302025-10-17T15:43:22+5:30

गुजरात विधानसभा निवडणूक २०२७ साली होणार आहे परंतु निवडणुकीच्या २ वर्ष आधीच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने मंत्रिमंडळात फेरबदल केले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये आज नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.

गांधीनगरच्या महात्मा मंदिरात झालेल्या शपथग्रहण समारंभात २५ नव्या मंत्र्‍यांना मंत्रि‍पदाची शपथ देण्यात आली. ज्यातील ६ असे चेहरे आहेत जे याआधीच्या मंत्रिमंडळात सहभागी होते. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कॅबिनेटमध्ये फेरबदल करण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या या फेरबदलात भूपेंद्र सरकारमध्ये गृह मंत्री राहिलेले हर्ष सांघवी यांना यावेळी मोठी जबाबदारी देण्यात आली. हर्ष सांघवी यांना गुजरातमध्ये उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. ४० वर्षीय हर्ष सांघवी जैन समुदायातून येतात. जे व्यापारी वर्गातून येतात.

गुजरातच्या भूपेंद्र पटेल कॅबिनेटमध्ये मोठ्या स्तरावर झालेल्या फेरबदलामागे भाजपाची रणनीती व्यापारी वर्गात आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवणे आणि ते आणखी मजबूत करणे हे असू शकते असं काही राजकीय तज्ज्ञ सांगतात.

हर्ष सांघवी कोण आहे? - सूरत येथील एका हिरा व्यापाऱ्याच्या घरात ८ जानेवारी १९८५ साली हर्ष सांघवी यांचा जन्म झाला. वयाच्या १५ व्या वर्षीच ते राजकारणात सक्रीय झाले. ते भाजपाच्या युवा मोर्चा विंगशी जोडलेले होते. त्यानंतर संघटनेत महत्त्वाच्या पदांवर राहिले आहेत.

सक्रीय राजकारणात संघटनेत केलेली मेहनत आणि त्यावर जोरावर मिळालेले यश यामुळे २०१० साली भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश महामंत्रिपदाची जबाबदारी हर्ष यांच्यावर आली. त्यावेळी प्रदीप सिंह वाघेला अध्यक्ष होते.

प्रदीप सिंह वाघेला यांच्या नेतृत्वात भाजपा युवा मोर्चा गुजरातने २०११ साली श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याची घोषणा केली होती. लाल चौकात तिरंगा फडकवणाऱ्या गुजरातमधील नेत्यांमध्ये हर्ष सांघवी यांचाही समावेश होता. तत्कालीन सरकारने भाजपाच्या या मोहिमेला परवानगी दिली नव्हती. त्यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही झाला होता.

हर्ष सांघवी यांनी राजकारणात स्वत:ची वेगळी छाप पाडली. २०२० साली भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची निवड होणार होती तेव्हाही स्पर्धेत हर्ष सांघवी यांचे नाव आघाडीवर होते. परंतु या शर्यतीत तेजस्वी सूर्या यांनी बाजी मारली.

हर्ष सांघवी २०१२ साली पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी त्यांचे वय केवळ २७ वर्ष होते. गुजरातमधील सर्वात कमी वयाचे गृह मंत्री म्हणून हर्ष यांना ओळखले जाते. आता भूपेंद्र पटेल यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारत युवकांचा देश आहे असं म्हटले जाते, प्रत्येक पक्षाचा फोकस युवकांवर असतो. हर्ष सांघवी भाजपाचा युवा चेहरा आहेत. आता पक्षाने त्यांना राज्यात नंबर २ चेहरा बनवले आहे. त्यामागे युवकांची रणनीती असल्याचे सांगितले जाते.

हर्ष सांघवी जैन समुदायातून येतात, जे अल्पसंख्याक मानले जातात. विजय रूपाणी हेदेखील जैन समाजाचे होते. अहमदाबाद प्लेन दुर्घटनेत त्यांचे निधन झाले. हर्ष सांघवी यांना गुजरात सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान देत अल्पसंख्याक नेतृत्व उभारण्याचा मानस भाजपाचा असल्याचं विश्लेषक म्हणतात.