CoronaVirus News : "कोरोनावरील लसीसाठी जगभरातील शक्तीशाली व्यक्ती करतायेत कॉल"
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 13:31 IST2020-08-03T13:02:08+5:302020-08-03T13:31:59+5:30

कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी देशातील अनेक फार्मा कंपन्यांमध्ये वेगवान काम केले जात आहे. त्यातील एक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने ही कंपनी लस विकसित करीत आहे.

कोरोना व्हायरसवर दुहेरी मात करण्यास ही लस यशस्वी झाली आहे. या लसीचे निम्मे उत्पादन भारतातील रुग्णांना उपलब्ध होईल, असे कंपनीचे प्रमुख अदर पूनावाला यांनी सांगितले.

न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अदर पूनावाला म्हणाले की, "ऑक्सफोर्डच्या शास्त्रज्ञांसोबत दर मिनिटाला 500 डोस बनविण्याची तयारी आहे. मला जगभरातील राष्ट्रपती, पंतप्रधान आणि आरोग्य मंत्र्यांचे कॉल आले आहेत. सर्व लसींची पहिली तुकडी मागत आहेत. मला सतत कॉल येत आहेत. अनेक लोकांना तर मी ओळखत नाही."

अदर पूनावाला म्हणाले की, ही चाचणी यशस्वी झाल्यास आम्ही भारतात 50 कोटींपेक्षा जास्त लस देऊ. लसीचे डिझाइन करणाऱ्या कंपन्यांचे म्हणणे आहे की, जर चाचणी यशस्वी झाली तर त्यांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या फॅक्टरींची गरज भासू शकेल.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती कंपनी आहे. दरवर्षी दुसर्या लसीचे दीड अब्ज डोस केले जातात. जे गरीब देशांमध्ये पाठविले जातात. जगातील निम्म्या मुलांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लस दिली आहे.

काही दिवसांपूर्वी कंपनीने 60 कोटी ग्लासचे वायल मागविले होते. अदर पूनावाला यांच्यावर खूप दबाव आहे. लसीच्या पहिल्या तुकडीसाठी बर्याच देशांकडून मागणी केली जात आहे. मात्र, ते 50 टक्के डोस भारतात ठेवण्याचा प्रयत्न करतील. उर्वरित 50 टक्के डोस इतर देशांमध्ये पाठविला जाईल.

अदर पूनावाला यांचे म्हणणे आहे की, आमचे लक्ष गरीब देशांकडे असेल. लस बनवण्याची प्रक्रिया 6 महिन्यांपासून सुरू आहे. आम्हाला हे लवकरच संपवायचे आहे.

ऑक्सफोर्डसोबत प्रमुख भागीदार अॅस्ट्रॅजेनेका आहे. त्यांनी अमेरिका, युरोप आणि इतर ठिकाणी लस तयार करण्यासाठी 7500 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा करार केला आहे.

सीरम इंस्टीट्यूटलाही ही लस बनविण्याची परवानगी मिळाली आहे. फरक इतकाच आहे की, त्यांची कंपनीने उत्पादनाचा संपूर्ण खर्च उचलला आहे. ऑक्सफोर्डची लस 70-80 टक्के यशस्वी होण्याची अपेक्षा अदर पूनावाला यांना आहे.
















