Lockdown: भारत पुन्हा थांबणार, देशभरात पूर्णपणे लॉकडाऊन लागणार?; केंद्र सरकारने दिलं स्पष्ट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 08:13 AM2021-05-07T08:13:42+5:302021-05-07T08:19:45+5:30

Coronavirus News: देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. परिस्थिती बिघडू लागल्याने अनेक राजकीय नेते आणि तज्ञ मोदी सरकारला देशात लॉकडाउन लावण्याचा सल्ला देत आहे.

देशात दैनंदिन रुग्णसंख्या आणि कोरोनाबळींच्या संख्येने गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत चार लाख १२ हजार २६२ रुग्ण आढळले, तर ३९८० रुग्णांचा मृत्यू झाला.

दोन कोटी १० लाख ७७ हजार ४१० वर पोहोचली, तर मृतांची संख्या दोन लाख ३० हजार १६८ झाली. देशातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत असून ही संख्या ३५ लाख ६६ हजार ३९८ वर पोहोचली आहे.

देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून दैनंदिन रुग्णसंख्या उच्चांक गाठत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे.

तसेच देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यावेळी लहान मुलांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर संसर्ग होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. परिस्थिती बिघडू लागल्याने अनेक राजकीय नेते आणि तज्ञ मोदी सरकारला देशात लॉकडाउन लावण्याचा सल्ला देत आहे.

यामुळे केंद्र सरकार देशात लॉकडाऊन लावणार का? अशी विचारणा करण्यात येत होती. त्यातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लॉकडाऊनचा विचार करण्याचे संकेत दिले आहेत.

एकीकडे अनेक तज्ञ आणि राजकीय नेते करोनाच्या दुसऱ्या लाटेसोबत लढण्यासाठी पंतप्रधानांना लॉकडाउन लावण्याचा सल्ला देत असताना निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी सांगितलं की, १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी दर आणि ६० टक्क्यांहून आयसीयू बेड्सची व्याप्ती असणाऱ्या राज्यांना आधीच नाईट कर्फ्यू आणि कठोर निर्बंध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

निती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी पत्रकार परिषदेदरम्यान लॉकडाउनच्या पर्यायावर चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. व्ही के पॉल हे टास्क फोर्सचे प्रमुखदेखील आहेत.

स्पष्ट आणि संतुलित नियमावली देण्यात आली आहे. त्याचवेळी अजून काही निर्बंध वाढवण्याची गरज असेल तर त्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो आणि गरजेप्रमाणे ते निर्णय घेतले जातील, असं व्ही के पॉल यांनी सांगितलं आहे. राज्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच देण्यात आली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

४ मे रोजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन एकच मार्ग शिल्लक असल्याचं सांगितलं. त्याचसोबत लॉकडाऊनमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या लोकांसाठी सुरक्षित रक्कम योजना देण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला.

दुसरीकडे केंद्र सरकार देशात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यापासून मागे हटत आहे. कारण लोकांचे जीव वाचवावेत की इकोनॉमी या द्विधा मनस्थितीत सरकार आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल. जी सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर सोडला आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावले आहेत. यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.