या ठिकाणी झाली होती भारतातील ऐतिहासिक युद्धे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:25 PM2020-02-13T22:25:14+5:302020-02-13T22:48:51+5:30

युद्धस्थ कथा रम्या: असे म्हटले जात असले तरी या युद्धाचे चांगले वाईट परिणाम युद्ध करणारे देश आणि तेथील समाजावर होत असतात. आपल्या देशातही देशाच्या इतिहासावर परिणाम घडवून आणणारी मोठी युद्धे होऊन गेली आहेत. या युद्धांचा आणि ती जिथे झाली त्या ठिकाणांचा घेतलेला हा आढावा.

हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे भारताचा इतिहास आणि संस्कृतीवर गेल्या हजारो वर्षांपासून प्रभाव टाकणारे कौरव आणि पांडवामधील महाभारताचे युद्ध झाले होते. येथेच श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती.

सम्राट अशोक आणि कलिंग राजा यांच्यात इसवी सनपूर्व 262 मध्ये भीषण युद्ध झाले होते. या युद्धात मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला होता. त्यामुळे युद्धात विजय मिळाल्यानंतर सम्राट अशोकाने हिंसेचा मार्ग सोडून बौद्ध धर्माची दीक्षा घेत शांतीचा मार्ग अवलंबला.

हरियाणामधील पानीपत हे शहर आज निवासी भाग झाले आहे. मात्र हे शहर मध्ययुगात भारतामध्ये झालेल्या तीन मोठ्या लढायांचे साक्षीदार आहे. पानीपतचे पहिले युद्ध इस १५२६ मध्ये बाबर आणि इब्राहीम लोधी यांच्यात झाले होते. तर दुसरे युद्ध १५५६ मध्ये अकबर आणि हेमू यांच्यात झाले होते. तर पानीपतचे तिसरे युद्ध १७६१ मध्ये मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झाले होते.

हरियाणातील तराइन येथे तीन युद्धे झाल्याचे सांगण्यात येते. हे क्षेत्र सध्या हरियाणातील कुरुक्षेत्रपासूनजवळ असलेल्या थानेश्वर येथे आहे. यातील पहिले युद्ध ११९१ मध्ये पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घौरी यांच्यात झाले होते. यात पृथ्वीराज चौहान यांचा विजय झाला होता. तर दुसऱ्या युद्धात मोहम्मद घौरी जिंकला होता.

इस १५७६ मध्ये महाराणा प्रताप आणि मुघल बादशाह अकबर यांच्यात हल्दीघाटची लढाई झाली होती.

इस १७५७ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांच्यात प्लासीची लढाई झाली होती. यात ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेचा विजय झाला होता. त्यानंतर या कंपनीने हळुहळू आपले हातपाय पसरले.

बंगालचा नवाब मीर कासिम, अवधचा नवाब आणि मुघल बादशाह शाह आलम द्वितीय विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इस १७६४ मध्ये बक्सरची लढाई झाली होती. या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाला होता.

टिपू सुलतानाने ब्रिटिशांना कडवी लढत दिली होती. त्याने १७६६ आणि १७८२ मध्ये म्हैसूर येथे झालेल्या दोन लढायांत ब्रिटिशांचा पराभव केला होता. मात्र १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणम येथे ब्रिटिशांच्या आक्रमणाचा सामना करताना टिपू सुलतानाचा मृत्यू झाला होता.