असा कोणता शाप की...! या गावातील तरुणांशी मुली लग्नच करायला तयार नाहीत; आमदारांपर्यंत मांडली व्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 13:37 IST2025-03-23T13:31:48+5:302025-03-23T13:37:25+5:30
कोणी म्हणते हवे तेवढे कमवत नाही, नशेडी आहे, व्यंगत्व आहे किंवा अन्य काही, अशी एखाद्या मुलाशी लग्न करण्याची कारणे असू शकतात.

एखाद्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न न करण्याची काही कारणे असू शकतात. कोणी म्हणते हवे तेवढे कमवत नाही, नशेडी आहे, व्यंगत्व आहे किंवा अन्य काही. परंतू, जर अख्ख्या गावातील मुलांशी जर कोणी लग्न करायला धजावत नसेल तर काय म्हणाल, होय एक गाव असे आहे जिथे त्या गावातील तरुणांना कोणी मुलीच द्यायला तयार होत नाहीय. यामुळे या गावाचे मुळ नाव बदलून 'अविवाहितांचे गाव' असे पडले आहे.
कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील जोंदालगट्टी असे नाव आहे. या गावातील असंख्य तरुणांचे लग्न होत नाहीय. या तरुणांसोबत लग्न करायला कोणी मुली तयार होत नाहीत. यामुळे या गावातील शाळेतही आता केवळ पाचच मुले आहेत. ज्यांची लग्ने झालीत त्यांचीही कशीबशी जुळविण्यात आली आहेत.
आता तुम्ही विचारात पडला असाल की मुली का लग्नाला तयार होत नाहीत. या गावातील तरुणांसमोर आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर मुलाचे लग्न लावणे म्हणजे एक मोठा टास्ट झाला आहे. मुली आणि त्यांचे कुटुंबीय या गावात सोयरीक जुळविण्यास नकार देत आहेत. असे नाहीय की यापूर्वी लग्ने झालेली नाहीत. लग्ने झाली परंतू आताच्या काळातही या गावाची परिस्थिती वाईट आहे, यामुळे इतर गावातील लोक या गावात मुली देण्यास नकार देतात.
आरोग्य सेवा, रस्ते, दळणवळणाच्या सुविधा आणि इतर आवश्यक सुविधाच नाहीत. यामुळे या गावात लग्न करून जाण्यास कोणतीही मुलगी तयार होत नाहीय. सुमारे २०० लोकसंख्या असलेल्या या गावात, २० हून अधिक तरुण गेल्या अनेक वर्षांपासून लग्न करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू एकालाही लग्नासाठी मुलगी मिळालेली नाहीय.
गावात नवीन मुले जन्माला येण्याचे चक्रच थांबल्याने तेथील शाळा देखील ओस पडली आहे. शाळेत केवळ ५ मुले आहेत. यावर्षी शाळेत नवीन प्रवेश झालेले आहेत. अंगणवाडी पूर्णपणे रिकामी झाली आहे. जोंदालगट्टीमध्ये बहुतांश मराठा समाजाचे लोक राहतात असे सांगितले जात आहे.
गावातील काही तरुणांनी आमदार यासिर अहमद खान पठाण यांच्यासोबत झालेल्या जनसंवाद बैठकीत लग्नाच्या समस्येबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे.
गावातून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी जंगलातून जावे लागते. काही दिवसांपूर्वी तिथे बस सेवा सुरू झाली असली तरी ती फक्त सकाळीच उपलब्ध असते. गावाची वाईट परिस्थिती पाहून मुली लग्न करण्यास नकार देतात, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.