काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:34 IST
1 / 10भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर क्रीक भागात पाकिस्तानच्या वाढत्या सैन्य हालचाली आणि बांधकामावर चिंता व्यक्त केली आहे. जर पाकिस्तानने या भागात कुठलेही धाडस करण्याचा प्रयत्न केला तर भारत त्याला जोरदार प्रत्युत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला2 / 10राजनाथ सिंह म्हणाले की, सर क्रीकमध्ये पाकिस्तान त्यांचे सैन्य वाढवत आहे. जर पाकिस्तानने काही चुकीचं पाऊल उचलले तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. कराचीला जाणारा एक रस्ता सर क्रीकमधून जातो हे पाकिस्ताननं लक्षात ठेवावे असं त्यांनी म्हटलं आहे. गुजरातच्या भूज येथे सैन्य तळावर राजनाथ सिंह यांनी दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन करण्याच्या कार्यक्रमात हे विधान केले.3 / 10स्वातंत्र्यानंतर भारताने ७८ वर्षात सर क्रीक भागात सीमा वाद सोडवण्याचा वारंवार प्रयत्न केला परंतु पाकिस्तानचा हेतू साफ नाही. आजही इतकी वर्ष हा वाद कायम आहे. भारताने या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाकिस्तानच्या हेतूत खोट आहे असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला.4 / 10काय आहे सर क्रीक वाद? - सर क्रीक हे गुजरातमधील कच्छ प्रदेश आणि पाकिस्तानातील सिंध प्रांत यांच्यामधील ९६ किलोमीटर लांबीची खाडी आहे. जी अरबी समुद्रात मिळते. हा परिसर दलदलीचा आणि भरती-ओहोटीने प्रभावित आहे. या भागात भारत-पाकिस्तान सीमा आहे आणि दोन्ही देशांमधील वादग्रस्त क्षेत्र देखील आहे.5 / 10भारत आणि पाकिस्तानमधील सागरी सीमा निश्चित करण्यात सर क्रीक महत्त्वपूर्ण आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित ते धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहे कारण ते सागरी व्यापार आणि नौदल हालचालींसाठी एक धोरणात्मक केंद्र म्हणून काम करते. हा प्रदेश नौदल हालचाली आणि सागरी देखरेखीसाठी महत्त्वाचा आहे.6 / 10सर क्रीक परिसरात माशांसह संभाव्य तेल आणि वायू साठ्यांसारखे सागरी संसाधने असू शकतात. मासेमारी, खाणकाम आणि इतर आर्थिक बाबींसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सागरी आर्थिक क्षेत्र (EEZ) चे सीमांकन करण्यासाठी देखील हे क्षेत्र महत्त्वाचे आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सर क्रीक सीमेवर वाद आहेत. 7 / 10सीमा खाडीच्या मध्यभागी असावी असा भारताचा असा दावा आहे तर सीमारेषा अजून जास्त भारताच्या बाजूने असावी असा पाकिस्तानचा दावा आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धापासून हा वाद सुरू आहे. भारताने नेहमीच या समस्येचे शांततापूर्ण निराकरण करण्याचा सल्ला दिला आहे, परंतु पाकिस्तानने वारंवार चिथावणीखोर कृती केल्या आहेत.8 / 10ऑपरेशन सिंदूर काळात पाकिस्तानने लेह ते सर क्रीक भागातून भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र भारतीय सैन्याने त्यांच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणेचा पूर्णपणे पर्दाफाश केला आणि भारतीय सैन्य कधीही, कुठेही आणि कसेही पाकिस्तानचे मोठे नुकसान करू शकते असा जगाला संदेश दिला असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं. 9 / 10'भारतीय लष्कर आणि बीएसएफ भारताच्या सीमांचे सतर्कतेने रक्षण करत आहेत. सर क्रीक परिसरात पाकिस्तानने केलेल्या कोणत्याही आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल जे इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलेल. पाकिस्तानने हे लक्षात ठेवावे की कराचीला जाणारा एक मार्ग खाडीतून जातो असं राजनाथ सिंह यांनी सूचित केले. 10 / 10पाकिस्तानी लष्कराने अलीकडेच सर क्रीकला लागून असलेल्या भागात ज्या पद्धतीने आपल्या लष्करी पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे त्यावरून त्यांचे हेतू स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर क्रीक वाद सोडवण्याचा पाकिस्तानचा हेतू स्पष्ट नाही हे दिसून येते असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला.