By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 18:55 IST
1 / 10मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट उभं राहिले आहे. स्ट्रेट होर्मुझमधून होणाऱ्या तेल वाहतुकीवर परिणाम झाल्याने भारताला फटका बसला आहे. त्यात एका दूरच्या मित्राने संकटकाळात भारताला एलपीजी पुरवण्याची तयारी दर्शवली आहे. 2 / 10पश्चिम आशियातील तणावात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारत आपल्या एलपीजीच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर जागतिक पुरवठ्यावर अवलंबून आहे. भारताची अंदाजे ६० टक्के आयात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. मात्र इराणने युद्धामुळे हा मार्ग ठप्प पडला आहे ज्याचा भारतावर परिणाम झाला आहे.3 / 10मात्र या गरजेच्या वेळी भारताला अर्जेंटिनाकडून मदत मिळाली आहे. २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत अर्जेंटिनाने भारताला ५०,००० टन एलपीजी निर्यात केला आहे. तर २०२५ मध्ये अर्जेंटिनाकडून केवळ २२,००० टन एलपीजी आयात करण्यात आला होता. अशाप्रकारे केवळ तीन महिन्यांत भारताची आयात दुप्पटीहून अधिक झाली आहे.4 / 10'इकॉनॉमिक टाइम्स' च्या एका रिपोर्टनुसार, इराण युद्ध सुरू होण्यापूर्वीच बाहिया ब्लान्का बंदरातून ३९,००० टन एलपीजी भारतात दाखल झाला होता तर ५ मार्च रोजी अर्जेंटिनामधून भारतात ११ हजार टन एलपीजी पाठवण्यात आला. अर्जेंटिनाने २०२४ पूर्वीपर्यंत भारताला एलपीजीचा पुरवठा केला नव्हता. मात्र या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनुसार अर्जेंटिना आता भारताच्या एलपीजी बाजारपेठेत आपला विस्तार करण्याची शक्यता आहे.5 / 10भारतातील अर्जेंटिनाचे राजदूत मारियानो ऑगस्टिन कौसिनो यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. अर्जेंटिनाकडे गॅसचे मोठे साठे असून ते भारताला गॅस पुरवठा करण्यास तयार आहेत असं त्यांनी सांगितले. अर्जेंटिना दीर्घकाळासाठी गॅस पुरवठा करण्यास तयार - अर्जेंटिनाकडे गॅसचे मोठे साठे आहेत. आमच्या राष्ट्रीय गॅस आणि तेल कंपनीच्या अध्यक्षांनी गेल्या वर्षी दोनदा भारताला भेट दिली. त्यांनी भारतीय ऊर्जा कंपन्यांशी चर्चा केली आणि मंत्री हरदीप पुरी यांचीही अनेक वेळा भेट घेतली. 6 / 10त्यामुळे हे सहकार्य अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे दोन्ही देशांना एकत्र काम करण्याची आणि या क्षेत्रात परस्पर सामंजस्य निर्माण करण्याची गरज अधिक तीव्र होऊ शकते असं राजदूत मारियानो ऑगस्टिन कौसिनो यांनी म्हटलं.7 / 10भारत सरकार गेल्या काही वर्षांपासून आपली नैसर्गिक संसाधने आणि ऊर्जा पुरवठा वैविध्यपूर्ण करण्याच्या धोरणावर काम करत आहे, ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे असा विश्वास राजदूत ऑगस्टिन कौसिनो यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनीही संसदेत भारत ४० हून अधिक देशांकडून ऊर्जा मिळवण्याचे धोरण विकसित करत आहेत असं सांगितले होते. अर्जेंटिना त्यापैकी एक असू शकतो. 8 / 10दोन्ही देश कृषी आणि खनिज क्षेत्रातील सहकार्यावर अत्यंत सकारात्मकतेने काम करत आहेत. आम्ही आमच्या परस्पर सहकार्याच्या एका नव्या पर्वाची सुरुवात करत आहोत. भारत सध्या अर्जेंटिनाचा पाचवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि एक प्रमुख निर्यातदार देश आहे. अर्जेंटिना भारताला खाद्यतेलाचा, विशेषतः सोयाबीन तेलाचा, एक महत्त्वाचा पुरवठादार आहे. 9 / 10या देशातून होणाऱ्या इतर प्रमुख आयातीमध्ये सूर्यफूल तेल, प्रक्रिया केलेले चामडे, धान्ये, अवशिष्ट रसायने आणि कडधान्ये यांचा समावेश होतो. हायड्रोकार्बन्स आणि महत्त्वपूर्ण खनिजे या क्षेत्रांमध्येही सहकार्य विस्तारत आहे. अर्जेंटिना भारताला गॅस पुरवठा करण्यास इच्छुक आहे, परंतु दोन्ही देशांमधील अंतर ही एक मोठी समस्या आहे. दक्षिण अटलांटिक महासागरापलीकडे असलेला अर्जेंटिना ते भारत हा सागरी मार्ग जगातील सर्वात लांब मार्गांपैकी एक आहे. 10 / 10या अंतरामुळे मालवाहतुकीचे दर लक्षणीयरीत्या वाढतात. अर्जेंटिनाच्या बाहिया ब्लान्का बंदरापासून भारतातील गुजरातच्या दाहेज बंदरापर्यंतचे अंतर अंदाजे १९,००० ते २०,००० किलोमीटर आहे. यामुळे खर्च वाढतो आणि पुरवठा साखळीत विलंब होतो. या लांबच्या प्रवासात हवामानाचे अडथळेही लक्षणीय असतात. मात्र भारताची ऊर्जा सुरक्षा आणि अर्जेंटिनाच्या निर्यातीच्या महत्त्वाकांक्षा यांमुळे ते फायदेशीर ठरते. मध्य-पूर्वेतील संकटामुळे भारताने आपल्या ऊर्जा पुरवठ्याच्या विविधीकरणावर भर दिला आहे, ज्यामुळे अर्जेंटिना आणि भारत या दोघांनाही फायदा होईल.