रात्री पाकिस्तान, सकाळी हिंदुस्तान, १९७१ च्या युद्धात भारतीय लष्कराने रातोरात जिंकला होता गिलगिट-बाल्टिस्तानचा हा भाग

By बाळकृष्ण परब | Published: December 16, 2020 04:02 PM2020-12-16T16:02:11+5:302020-12-16T16:22:37+5:30

Gilgit-Baltistan In India : गिलगिट-बाल्टिस्थान, जम्मू-काश्मीरचा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला निसर्गसौंदर्याने संपन्न असा भाग. या गिलगिट-बाल्टिस्थानमधील काही भाग १९७१ युद्धात भारताने जिंकला होता हे फारच कमी जणांना माहिती आहे. आज जाणून घेऊया त्या भागाविषयी.

गिलगिट-बाल्टिस्थान, जम्मू-काश्मीरचा सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला निसर्गसौंदर्याने संपन्न असा भाग. या गिलगिट-बाल्टिस्तानची पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्तता करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र या गिलगिट-बाल्टिस्थानमधील काही भाग १९७१ युद्धात भारताने जिंकला होता हे फारच कमी जणांना माहिती आहे. आज जाणून घेऊया त्या भागाविषयी.

आज १९७१ च्या युद्धातील भारतीय लष्कराच्या विजयाचा ५० वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

तसेच भारतीय लष्कराच्या शौर्याच्या कहाण्याही सांगितल्या जात आहेत. त्यातील ९० हजार पाकिस्तानी सैनिकांची शरणागती आणि लोंगेवालामधील लढाईच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. मात्र या युद्धात भारतील लष्कराने अनेक आघाड्यांवर पाकिस्तानला धूळ चारली होती.

त्यातीलच एक लढाई लढली गेली होती ती गिलगिल बाल्टिस्थानमधील एका गावात. १९४७ पासून त्या रात्रीपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात असलेला हा गाव भारतीय लष्कराने रातोरात जिंकून भारतात सामील करवून घेतला होता.

या गावाचे नाव आहे तुरतुक. असे सांगितले जाते की, भारत आणि पाकिस्तानमध्ये तुंबळ लढाई सुरू असताना येथील रहिवासी एके रात्री झोपले असताना ते पाकिस्तानमध्ये होते. तर सकाळी उठले तेव्हा त्यांचा गाव भारताच्या हद्दीत आला होता. अजूनही या गावातील लोकांचे नातेवाईक हे नियंत्रण रेषेपलीकडे वास्तव्यास आहेत.

१९७१ च्या युद्धात तुरतुकमध्ये ८ ते १४ डिसेंबरदरम्यान युद्ध लढले गेले होते. येथील लढाईत मिळालेल्या यशामुळे या भागातील सुमारे ८०० चौकिमीचे क्षेत्र भारताच्या कब्जात आले होते. या लढाईत मेजर जनरल एस.पी. मल्होत्रा, कर्नल उदय सिंह आणि मेजर चेवांग रिजेन यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

अखंड जम्मू-काश्मीरमधील निसर्ग-सुंदर असलेला गिलगिट-बाल्टिस्थान हा भाग पूर्णपणे पाकिस्तानच्या कब्जात आहे. त्यापैकी केवळ चार गावे भारताच्या ताब्यात आहेत. त्याक्षी, चुलुंका आणि थांग ही त्यापैकी तीन गावं असून, तुरतुक हे गाव भारताने १९७१ मध्ये जिंकले होते.

सध्या तुरतुक गावाचा समावेश भारतातील लडाख या केंद्रशासित प्रदेशातील नुब्रा तालुक्यामध्ये करण्यात आलेला आहे. हा गाव लेहपासून २०५ किमी अंतरावर आहे. तुरतुक हा गाव सियाचिन ग्लेशियरच्या प्रवेशद्वारांपैकी एक आहे. तसेच जुन्या काळातील रेशीम मार्ग याच गावातून जात असे.

नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ असल्याने हा भाग संवेदनशील आहे. मात्र २०१० पासून येथे पर्यटनास परवानगी देण्यात आली आहे. या गावात पर्यटकांना बाल्टी संस्कृती पाहता येते. येथे काही होम स्टे आणि गेस्ट हाऊस आहेत.