शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पाकिस्तानच्या ताब्यात होता भारतीय वैमानिक; 8 दिवसांनंतर झाली होती सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 3:22 PM

1 / 7
भारताचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. अशीच एक घटना 20 वर्षांपूर्वी घडली होती. कारगिल युद्धावेळी भारतीय हवाई दलाचे वैमानिक पाकिस्तानच्या हाती लागले होते. त्यांचं नाव के. नचिकेता होतं. नचिकेता यांची पाकिस्तानच्या ताब्यातून सुटका करण्यात भारताला यश आलं होतं.
2 / 7
3 जून 1999 रोजी कारगिल युद्धावेळी भारतीय हवाई दलानं 'ऑपरेशन सफेद सागर' हाती घेतलं होतं. त्यावेळी नचिकेता यांनी मिग 27 विमान घेऊन उड्डाण केलं. त्यावेळी त्यांचं वय 26 वर्षं होतं. नचिकेता यांनी 17 हजार फुटांवरुन पाकिस्तानच्या तळांवर रॉकेट डागले. मात्र त्याचवेळी त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि ते क्रॅश झालं.
3 / 7
नचिकेता विमानातून सुरक्षितपणे बाहेर पडले. मात्र ते पाकव्याप्त काश्मीरमधील सैनिकांच्या हाती लागले. त्यांच्यावर पाकिस्तानी सैन्यानं शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. शत्रूसैन्यानं त्यांच्याकडून भारतीय हवाई दलाच्या योजनेची गोपनीय माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
4 / 7
नचिकेता यांना पाकिस्ताननं ताब्यात घेतल्याचं वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दाखवलं. त्यानंतर पाकिस्तावर मोठा दबाव निर्माण झाला. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यानं 8 दिवसांनंतर नचिकेता यांना इंटरनॅशनल कमेटी ऑफ द रेड क्रॉसकडे सुपूर्द केलं. यानंतर नचिकेता यांना वाघा बॉर्डरवर भारतात पाठवण्यात आलं.
5 / 7
नचिकेता यांच्या स्वागतासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी वाघा बॉर्डरवर गेले होते. वाजपेयी यांनी नचिकेता यांचं जोरदार स्वागत केलं. कारगिल युद्ध 26 जुलै 1999 रोजी संपलं. वायू सेना पदकानं नचिकेता यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यात आला.
6 / 7
कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या नचिकेता यांचा जन्म 31 मे 1973 रोजी झाला. त्यांनी दिल्लीतील केंद्रीय विद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं. यानंतर पुण्याच्या खडकवासलातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतून त्यांनी प्रशिक्षण घेतलं. त्यांनी 1990 ते 2017 या कालावधीत हवाई दलात सेवा दिली. ते ग्रुप कॅप्टन होते.
7 / 7
कारगिल युद्धावेळी जखमी झाल्यानं नचिकेता यांना 1999 नंतर लढाऊ विमानानं उड्डाण करता आलं नाही. मात्र तरीही त्यांच्यातील वैमानिक स्वस्थ बसला नाही. ते हवाई दलाचं महाकाय II-76 वाहतूक विमान घेऊन उड्डाण करायचे.
टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी