बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:52 IST2025-11-21T16:47:52+5:302025-11-21T16:52:22+5:30

भारतीय सेनेचा मोठा निर्णय: L&T आणि BAE Systems सोबत BvS10 सिंधू वाहन खरेदीचा करार!

भारतीय सैन्य आपल्या लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल क्षमतेला वाढवण्यासाठी मोठमोठे निर्णय घेत आहे. आता सैन्याने लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि BAE Systems यांच्यासोबत BvS10 ‘सिंधू’ ऑल-टेरेन वाहन (AATV) खरेदीचा महत्त्वपूर्ण केला आहे. हे वाहन हिमालय, बर्फाच्छादित प्रदेश, दलदल, वाळवंट आणि पाण्यातदेखील धावू शकते. यामुळे सैन्याला दुर्गम ठिकाणी मोठी मदत होणार आहे.

या करारानुसार BvS10 सिंधू वाहनांचे उत्पादन गुजरातमधील हजीरा आर्मर्ड सिस्टम्स कॉम्प्लेक्स येथे L&T निर्मित करणार आहे. स्वीडनस्थित BAE Systems Hägglunds कंपनी डिझाइन आणि तांत्रिक सहाय्य पुरवेल. विशेष म्हणजे, BvS10 वाहनाची आशियातील पहिली मोठी ऑर्डर ठरली आहे. सैन्य आणि कंपन्यांनी करारातील वाहनांची संख्या व किंमत जाहीर केली नसली तरी, हा निर्णय देशाच्या लष्करी क्षमतेला मोठा बळकटी देणारा आहे.

BvS10 सिंधू हे दोन जोडलेल्या भागांचे बख्तरबंद वाहन आहे, जे पर्वतीय प्रदेश, बर्फ, दलदल आणि पाण्यात उत्तमरीत्या चालू शकते. यात 5.9 लि. इन-लाइन सिक्स सिलेंडर कमिंस टर्बो डिझेल इंजिन दिले आहे, जे 250-285 HP पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. याचा जमिनीवरील कमाल वेग 65 किमी/तास आहे, तर पाण्यात 5 किमी/तास आहे. याचे वजन अंदाजे 10,500 किलो असून, पेलोड क्षमता: 5-8 टन आहे. यातून 14 सैनिक प्रवास करू शकतात.

याच्या विशेष क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे वाहन 45° चढ चढू शकते, 2 मीटर रुंदीची खाई पार करू शकते, बर्फ, दलदल आणि पाण्यात सहजपणे चालते (एम्फिबियस). लद्दाख, सियाचिन आणि हिमालयातील हवामानासाठी हे वाहन अतिशय योग्य मानले जाते.

हजीरामध्ये यापूर्वीही L&T ने K9 वज्र-टी हॉवित्झर प्रणालीचे यशस्वी उत्पादन केले आहे. BAE Systems ही जगातील सर्वात मोठ्या संरक्षण कंपन्यांपैकी एक असून, अनेक देशांत अशा ऑल-टेरेन वाहनांची पुरवठादार आहे. या करारामुळे भारतीय सेनेची तांत्रिक क्षमता, गतिशीलता आणि सीमावर्ती ऑपरेशन्सची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.