शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rahul Gandhi Property: ७३ किलोंंच्या विटा, दागिने राहुल गांधींची वाट पाहताहेत; 50 वर्षांपासून तिजोऱ्यांत सांभाळून ठेवलेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 6:40 PM

1 / 8
उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील कोषागारात गेल्या ५० वर्षांपासून जवळपास ७३ किलो चांदीच्या वस्तू, दागिने सांभाळून ठेवण्यात आले आहेत. गांधी घराण्यातील कोणतरी येईल आणि ते घेऊन जाईल, याचीच वाट पाहिली जात आहे. परंतू, अर्धे शतक लोटले तरी गांधी कुटुंबाचा कोणीही तिकडे फिरकलेला नाहीय.
2 / 8
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सुमारे 51 लाख रुपये किमतीची 73 किलो चांदीची भेट यूपीमधील बिजनौरच्या तिजोरीत पडून आहे. तिजोरी रिकामी करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून अनेकदा करण्यात आले. परंतू त्यात यश आले नाही. 1972 मध्ये तत्कालीन पंतप्रधानांना भेट म्हणून दिलेले मौल्यवान वस्तू, दागिने जिल्ह्याच्या तिजोरीत ठेवण्यात आले होते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
3 / 8
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या चांदीवर दावा करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा कोषागार अधिकारी सूरज कुमार यांनी सांगितले की, 1972 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यूपी-उत्तराखंड सीमेवर निर्माण होत असलेल्या कालागढ धरणाला भेट देण्यासाठी आल्या होत्या. पंतप्रधान इंदिरा गांधी जेव्हा कालागड धरणावर पोहोचल्या तेव्हा तेथील रहिवाशांनी त्यांची चांदीची तुला केली होती.
4 / 8
याशिवाय मौल्यवान धातूपासून बनवलेल्या इतर अनेक वस्तू त्यांना भेट देण्यात आल्या होत्या. परंतू यापैकी काहीच इंदिरा गांधी यांनी सोबत नेले नव्हते. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना या दागिन्यांची काळजी घेण्यास सांगितले होते.
5 / 8
तेव्हापासून या चांदीच्या वस्तू जिल्हा कोषागारात पडून आहेत. त्याचे काय करायचे याचे स्पष्ट निर्देश नाहीत. 2002 मध्ये, जिल्हा प्रशासनाने त्यावर दावा करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिले होते. यावर आरबीआयने ती खासगी मालमत्ता असल्याचे उत्तर पाठविले होते. याच कारणावरून एका संग्रहालयानेही या वस्तू घेण्यास नकार दिला होता.
6 / 8
या चांदीवर गांधी कुटुंबाने दावा केला तरच सर्व आवश्यक प्रक्रिया पार पाडून मौल्यवान वस्तू त्यांच्या ताब्यात दिल्या जाऊ शकतात, अन्यथा त्या इथेच ठेवाव्या लागणार आहेत. वार्षिक तपासणीदरम्यान तिजोरीत ठेवलेली जड पेटी नियमितपणे तपासली जाते. मात्र, ती सीलबंद असल्याने कधीही उघडण्यात आलेली नाही.
7 / 8
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य ७० वर्षीय धरमवीर सिंग यांनीही याची पुष्टी केली आहे. मी ती तुला पाहिली आहे. तेव्हा एका मोठ्या तराजूची व्यवस्था करण्यात आली होती. इंदिरा एका बाजुला आणि चांदीच्या विटा दुसऱ्या बाजुला होत्या. चांदीचे वजन हे ६४ किलो भरले होते, असे ते सांगतात. स्थानिक लोक एवढ्यावरच थांबले नाहीत आणि इतर चांदीच्या वस्तूही दिल्या होत्या.
8 / 8
कलागढ धरण हे रामगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. हे यूपी-उत्तराखंड सीमेवर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या जागेत येते. उत्तराखंड जल विद्युत निगम लिमिटेड या धरणाचे व्यवस्थापन करते. धरणाचे बांधकाम 1961 मध्ये सुरू झाले आणि 1974 मध्ये पूर्ण झाले होते.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndira Gandhiइंदिरा गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशSilverचांदी