Ram Mandir जय श्रीराम! अयोध्येतील राम मंदिराचा गाभारा सोन्याचा करा; शिवसेना नेत्याचे PM मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:18 PM2021-08-03T14:18:44+5:302021-08-03T14:23:36+5:30

Ram Mandir: शेकडो वर्षांनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात आहे. या राम मंदिराचा गाभारा सोन्याचा असावा, अशी मागणी शिवसेनेच्या एका नेत्याने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने दिल्यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन केले. (Ram Mandir)

अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचा पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक विशेष महापूजा आणि इतर धार्मिक विधींच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम छोट्या स्वरुपात आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास आणि राज्याच्या माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

दुसरीकडे, शेकडो वर्षांनंतर अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जात आहे. या राम मंदिराचा गाभारा सोन्याचा असावा, अशी मागणी शिवसेनेच्या एका नेत्याने केली आहे. यासंदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले आहे.

शिवसेनेचे पूर्व उत्तर प्रदेशचे प्रमुख संतोष दुबे यांनी हे पत्र लिहिले आहे. ५०० वर्षांनंतर प्रभू रामलल्ला मंदिराची उभारणी केली जात आहे. देशभरातील कोट्यवधी नागरिक यासाठी समर्पण निधी, देणग्या देत आहेत. जागतिक स्तरावरील सर्वांत सुंदर हे मंदिर असावे.

या पार्श्वभूमीवर राम मंदिराचा गाभारा सोन्याचा असावा. प्रभू श्रीराम यांच्या गरिमेप्रमाणे गाभारा असावा. यासाठी समाज संपूर्ण सहकार्य करेल. या राम मंदिरासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. मोठा त्याग केला आहे, असेही संतोष दुबे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, आम्ही भूमिपूजनाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी योजना आखत आहोत. पण याबाबत सर्व गोष्टी ट्रस्ट ठरवणार आहे. या उत्सवाचे स्वरूप नक्की काय असेल हे सांगू शकत नाही, पण उत्सव होणार एवढे नक्की.

राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीचा तर ते येण्याची शक्यता आहे. परंतु या कार्यक्रमाबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांनी दिली आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्टला ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन केले होते, तिथेच ही खास पूजा होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

विशेष हवन, कलश स्थापना, समृद्धी-भरभराटीसाठी एक विशेष पूजा केली जाणार आहे. भगवान श्रीरामांच्या मूर्तीला नवीन वस्त्र नेसवण्यात येतील आणि इतर सजावट केली जाईल. कार्यक्रम गेल्या वर्षीप्रमाणे भव्य होणार नसून करोनाच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल.

या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट हे बांधकाम कार्याला गती देणे आणि दिलेल्या वचनाप्रमाणे ३६ महिन्यांच्या आत बांधकाम पूर्ण करणे हे आहे. राम मंदिराच्या बांधकामस्थळी असलेला मलबा हटवून त्याठिकाणी रोलर-कॉम्पॅक्टेड काँक्रिट भरण्याचे काम सुरू आहे.