पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देणार

By प्रविण मरगळे | Published: November 23, 2020 09:10 PM2020-11-23T21:10:49+5:302020-11-23T21:15:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २०१९ मधील वाराणसी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द करावी या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष आहे. बीएसएफमधून बरखास्त केलेल्या तेज बहादूर यादव यांनी सुप्रीम कोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती, खुद्द तेज बहादूर यादवने वाराणसी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती, त्यात ते अयशस्वी झाले.

यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी तेज बहादूर यादव यांच्या वकिलांना कोर्टाच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देता आली नाहीत, त्यामुळे सुप्रीम कोर्ट उद्या काय निर्णय देते हे पाहणे गरजेचे आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात वाराणसी जागेवरून भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना इलाहाबाद कोर्टाने मोठा दिलासा दिला होता, हायकोर्टाने वाराणसी जागेची निवडणूक रद्द करावी ही याचिका फेटाळून लावली होती.

ही याचिका सपा नेता आणि माजी सैनिक तेज बहादूर यादव यांच्याकडून केली होती, गुणवत्तेच्या आधारावर कोर्टाने अर्जावर सुनावणी न करता याचिका फेटाळून लावली.

या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना तेज बहादूर यादव हे वाराणसी मतदारसंघातील उमेदवार नव्हते आणि तेथील मतदारही नाहीत असं कोर्टाला सांगितले. त्यामुळे तेज बहादूर यादव यांना याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही.

कोर्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वकिलांना युक्तिवाद ग्राह्य धरत तेज बहादूर यादव यांचा याचिका अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणात न्यायाधीश मनोज कुमार गुप्ता यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाल्यानंतर २३ ऑक्टोबर २०१९ रोजी निकाल राखून ठेवला होता.

तेज बहादूर यादवने इलाहाबाद कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सुनावणी करताना पंतप्रधान कार्यालयाचं विशेष महत्व असतं, त्यामुळे पंतप्रधानाविरोधातील याचिका जास्तकाळ प्रलंबित ठेवता येत नाही

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एस, ए बोबडे तेज बहादूर यादव यांच्या वकिलांना म्हणाले की, तुम्ही न्यायाच्या प्रक्रियेचा गैरवापर करत आहात, त्यामुळे आम्ही तुम्हाला माफी का द्यावी? बहादूर यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, तेज बहादूर हे पहिल्यांदा अपक्ष उमेदवार होते, त्यानंतर समाजवादी पक्षाकडून त्यांनी स्वत:चा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

तेज बहादूर यादव यांनी लष्कराला मिळणाऱ्या जेवणात निष्कृटपणाची तक्रार करणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्यानंतर २०१७ मध्ये तेज बहादूर यादव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना सैन्यातून काढून टाकण्यात आलं.

तेज बहादूर यादव यांचा आरोप आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दबाव टाकल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने माझा अर्ज रद्द केला होता, त्यामुळे वाराणसी लोकसभा निवडणूक रद्द करावी अशी मागणी करणारी याचिका त्यांनी इलाहाबादच्या हायकोर्टात दाखल केली.