शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 1:48 PM

1 / 12
उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील चित्रकूटमध्ये मागील पाच दिवसांपासून सुरु असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठक समाप्त झाली. या बैठकीमध्ये संघटनेला मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.
2 / 12
कोरोना कालावधीत बंद पडलेले कार्यक्रम आणि शाखा पुन्हा सुरू करण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून, विशेष म्हणजे आता देशभरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे सांगितले जात आहे.
3 / 12
तसेच संघ संघटना आणखीन मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधीक लोकांपर्यंत संघाचे काम पोहचवण्यासाठी संघाने आयटी सेल सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. आयआयटीमधून उत्तीर्ण झालेल्यांना या माध्यमातून संधी देण्यात येणार असून, RSS चा आयटी सेल हा भाजपाच्या आयटी सेल पेक्षा वेगळा असेल.
4 / 12
प्रचारकांच्या माध्यमातून संघाच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर अधिक प्रमाणात सक्रीय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर संघाने कू या अ‍ॅपलाही पसंती दिल्याचे सांगितले जात आहे. RSS कू या भारतीय बनावटीच्या अ‍ॅपपासून ते प्रतिष्ठित सोशल नेटवर्कींग साईट्सवरुन आपल्या कामाचा प्रचार सुरु करणार आहे.
5 / 12
तसेच अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील १२.७० कोटी कुटुंबांनी योगदान दिले आहे. राम मंदिरासाठी एका रुपयाचेही दान दिलेल्या व्यक्तींना वा कुटुंबांशी RSS संपर्क करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी लवकरच एक अभियान सुरू केले जाणार आहे.
6 / 12
देशाच्या अखंडतेसाठी संघ दक्ष आणि सज्ज असून, समाजातील सर्व वर्गांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे समजते. ०३ एप्रिल २०२१ पर्यंत अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी ३५०० कोटी समर्पण निधी जमा झाला आहे.
7 / 12
१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत घेण्यात आलेल्या समर्पण अभियानाच्या माध्यमातून १२.७० कोटी कुटुंबांनी योगदान दिले. विश्व हिंदू परिषदेचे २०.२१ लाख कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची संख्या १.८७ कोटी होती. या अभियानासाठी १.७५ लाख पथके तयार करण्यात आली होती.
8 / 12
या समर्पण अभियानात ७.१० कोटी पावत्या १०० रुपयांच्या फाडल्या गेल्या. याशिवाय १० रुपयांची ४.५ कोटी, तर एक हजार रुपयांची ८० लाख पावत्या देण्यात आल्या. राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या कुटुंबांशी संघ संपर्क साधणार असून, अधिकाधिक लोकांना संघात सामावून घेणार असल्याचे समजते.
9 / 12
पश्चिम बंगालमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी संघाने मोठा निर्णय घेतला असून, राज्याची तीन खंडांमध्ये विभागणी करुन काम करण्यात येणार आहे. याशिवाय केवळ मोठ्या आणि लहान शहरांमध्ये असलेला संघाचा प्रभाव आता गावागावांमध्ये पोहोचवण्यासाठी योजना, रणनीती तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
10 / 12
पश्चिम बंगालमधील मुख्य कार्यालय कोलकातामध्ये, मध्य बंगालमधील कारभार वर्धमानमधून, तर राज्यातील उत्तरेकडील भागामधील संघाचे काम सिलीगुडीमधून हाताळले जाईल. पुढील वर्षी होणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाने ही रचना केल्याचे बोलले जात आहे.
11 / 12
क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशी यांना अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता भैय्याजी जोशी यांना संघ आणि विश्व हिंदू परिषदेदरम्यानचे संयोजक असतील.
12 / 12
तर, डॉक्टर कृष्ण गोपाल यांना विद्या भारतीचे प्रमुख संपर्क अधिकारी बनवण्यात आले आहे. तसेच अरुण कुमार यांना संघ आणि भाजपमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPoliticsराजकारणRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याITमाहिती तंत्रज्ञानBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल