सहानुभूती संपलीय का?; कर्मचारी कपातीवरून रतन टाटा 'भडकले', उद्योगपतींना चांगलेच सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 06:35 PM2020-07-24T18:35:26+5:302020-07-24T18:42:42+5:30

टाटा ग्रुपमध्ये एकाही कर्मचाऱ्याला बेरोजगार करण्यात आलेले नाहीय. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 20 टक्के कपात केली आहे, असे टाटा यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळामध्ये लॉकडाऊन झाल्याने अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरु केली आहे. छोट्या मोठ्या खासगीच नाही तर एअर इंडियानेही पाच वर्षे कर्मचाऱ्यांना बिनपगारी घरी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

या साऱ्या कर्मचारी कपातीवर टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा चांगलेच भडकले आहेत. त्यांनी या कंपन्यांना चांगलेच सुनावले आहे. टाटा यांनी न्य़ूज वेबसाईट YourStory ला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोना काळात कंपन्यांमधून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जात आहे. यावरून असे वाटत आहे की, कंपन्यांच्या मुख्य नेतृत्वाकडे सहानुभूतीची कमतरता झाली आहे. ज्या लोकांनी त्यांचे पूर्ण करिअर कंपनीसाठी खर्ची घातले त्या लोकांना पाठिंबा देण्याऐवजी बेरोजगार केले जात आहे, असा आरोप टाटा यांनी केला आहे.

टाटा यांनी उद्योगविश्वातील या उद्योगपतींना एक प्रश्न विचारला आहे. कोरोनाच्या संकटात यावेळी तुमचे कर्तव्य काय आहे. तुमच्यासाठी नैतिकतेची व्याख्या काय आहे? संकटाच्या काळात तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांसोबत या प्रकारे वागत आहात.

टाटा ग्रुपमध्ये एकाही कर्मचाऱ्याला बेरोजगार करण्यात आलेले नाहीय. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पगारात 20 टक्के कपात केली आहे, असे टाटा यांनी स्पष्ट केले.

उद्योगांमधून फायदा जरूर कमवावा. फायदा कमविणे चुकीचे नाही. मात्र, हा फायदादेखील नैतिकतेने कमविणे गरजेचे आहे. तुम्ही फायदा मिळविण्यासाठी काय काय करता हा प्रश्नही यासाठी खूप आवश्यक आहे.

फायदा कमविताना कंपन्यांनी ग्राहक आणि गुंतवणूकदारांसाठी काय काय दिले जात आहे, याचाही विचार करणे आवश्यक आहे. हे सारे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत संचालक, अधिकाऱ्यांनी हे प्रश्न स्वत:ला सारखे सारखे विचारायला हवेत की ते जो निर्णय घेत आहेत तो योग्य आहे का?, असा सल्लाही टाटा यांनी दिला आहे.

जी कंपनी आपल्या लोकांसाठी संवेदनशील नाही ती कंपनी अधिक काळ टिकू शकत नाही. व्यवसाय म्हमजे काही केवळ नफा कमाविणेच नाही. स्टेकहोल्डर्स, ग्राहक आणि कर्मचारी कंपनीशी जोडले गेले आहेत का हे देखिल पाहिले जाते. त्यांच्या हिताचाही विचार केला जावा, असा इशारा टाटा यांनी दिला.

टाटा ग्रुपच्या कंपन्या एअरलाईन, हॉटेल, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ऑटोमोबाईल सारख्या उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. ही अशी क्षेत्रे आहेत जिथे कोरोनामुळे मोठे संकट उभे ठाकले आहे. विमानसेवा, हॉटेल इंडस्ट्रीची हालत खूप खराब आहे, तर ऑटो सेक्टर कोरोनाच्या आधीपासून झगडत आहे. एवढे संकट असूनही टाटा ग्रुपने अद्याप एकाही कर्मचाऱ्याला कामावरून कमी केलेले नाहीय.

याउलट टाटा ग्रुपची आयटी सेवा पुरविणारी कंपनी टीसीएसने 40000 कँम्पस सिलेक्शनद्वारे नोकऱ्या देणार असल्याचे जाहीर केले आहे. ही सुवर्णसंधी फ्रेशर्ससाठी आहे. तर दुसरीकडे आयआयटीमध्ये खळबळ उडाली आहे.

आयआयटीच्या संस्थांमध्ये दरवर्षी विद्यार्थी पास होण्याआधीच कोटी कोटींमध्ये पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्या जातात. मात्र, कोरोनामुळे मोठमोठ्या कंपन्यांनी या ऑफर रद्द केल्या आहेत. तर काही कंपन्यांनी या ऑफर प्रतिक्षेत ठेवल्या आहेत.