मिशन दक्षिणपासून योगीपर्यंत, प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातून मोदी आणि भाजपाने दिले ५ मोठे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 05:11 PM2024-01-23T17:11:56+5:302024-01-23T17:15:51+5:30

Ram Mandir Ayodhya: अयोध्येती राम मंदिरामध्ये रामललांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये संपन्न झाला. या सोहळ्यावेळच्या काही घटनांमधून संघ, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मोठे राजकीय संकेत दिले आहेत. त्या संकेतांचा देशाच्या राजकारणावर पुढच्या काळात मोठा परिणाम होणार आहे. हे संकेत कोणते आहेत, याचा घेतलेला हा आढावा.

अयोध्येती राम मंदिरामध्ये रामललांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये संपन्न झाला. या सोहळ्यावेळच्या काही घटनांमधून संघ, भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मोठे राजकीय संकेत दिले आहेत. त्या संकेतांचा देशाच्या राजकारणावर पुढच्या काळात मोठा परिणाम होणार आहे. हे संकेत कोणते आहेत, याचा घेतलेला हा आढावा.

नरेंद्र मोदींकडे भाजपाचं नेतृत्व आल्यापासून पक्षाने आपलं वर्चस्व असलेल्या उत्तर भारतासह पश्चिम आणि पूर्व भारतात आपला आक्रमकपणे विस्तार केला आहे. मात्र खूप प्रयत्नांनंरही भाजपाला दक्षिणेत हातपाय पसरता आलेले नाहीत. त्यातच कर्नाटकमधील पराभवानंतर भाजपाची दक्षिणेत अधिकच कोंडी झाली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा मोदी आणि भाजपाने आपल्या दक्षिणेतील राजकाणरासाठी सोईस्कर वापर करून घेतला आहे. या सोहळ्यापूर्वी मोदींनी दक्षिणेतील अनेक प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊन त्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पुढच्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना पूर्णपणे भुईसपाट करण्याची तयारी भाजपाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी अब की बार ४०० पार असं घोषवाक्यही तयार करण्यात आलं आहे. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेण्याचा काँग्रेसचे पुरेपूर प्रयत्न केला होता. आता भाजपाही प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या माध्यमातून देशात रामलाट निर्माण करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे.

अयोध्येत झालेल्या रामललांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यातून योगी आदित्यनाथ यांच्या राजकीय भवितव्याबाबतही काही स्पष्ट संकेत मिळाले आहेत. एकीकडे या सोहळ्यापासून केंद्र सरकारमधील मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांना दूर ठेवण्यात आले होते. मात्र या सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोदींच्या बरोबरीने सहभागी करून घेण्यात आले. एवढेच नाही तर त्यांना भाषण करण्याचीही संधी मिळाली. ही केवळ औपचारिकता नव्हती तर त्या माध्यमातून योगींना सविस्तरपणे आपले विचार मांडण्यास पुरेसा वेळही देण्यात आला. यातून योगींकडे भाजपा आणि संघ भविष्यातील नेतृत्व म्हणून पाहतेय, असे संकेत मिळत आहेत.

एकेकाळी ब्राह्मण-बनियांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपाने पुढे आपला ओबीसींमध्ये विस्तार केला. त्यानंतर आता भाजपा हा मागासवर्गीयांचा पक्ष आहे, असे सांगण्यासही सुरुवात केली आहे. तसेच राम मंदिरामध्येही इतर वर्गातील पुजाऱ्यांसोबत दलित पुजाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच राम मंदिरातील पूजेसाठी यजमान म्हणून निवड करण्यात आलेल्या १५ जोडप्यांमध्ये काशी येथी डोम राजासह दलित आणि मागास वर्गीयांमधील जोडप्यांनाही सामावून घेण्यात आले होते.

आतापर्यंत देशातील अनेक कार्यक्रमांमध्ये वैदिक मंत्रोच्चार होत आले आहेत. मात्र सरकार यात सहभागी होत नसे. मात्र राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ दिवसांच्या व्रताचं पालन केलं. तसेच यजमान बनून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभाग घेतला. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळा यशस्वी व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आधित्यनाथ यांनी ज्या प्रकारे प्रयत्न केले. त्यामधून भारत हा घटनात्मक दृष्ट्या झाला नसला तरी कार्यकारीदृष्ट्या हे हिंदू राष्ट्र बनल्याचे संकेत देण्यात आले.