पंतप्रधान कौशल्य विकास योजनेबाबत माहित्येय का? आतापर्यंत १.२५ कोटी युवांनी घेतलाय फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:35 PM2021-07-15T12:35:37+5:302021-07-15T12:54:16+5:30

केंद्र सरकारनं पंतप्रधान कौशल्य विकास योजनेला (PMKVY) जुलै २०१५ साली सुरुवात केली. योजनाच्या माध्यमातून देशातील तरुणाईला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेमकी ही योजना काय आहे? याचा आजवर किती फायदा झालाय हे जाणून घेऊयात...

शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडलेल्या देशातील युवा वर्गाला रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशातून पंतप्रधान कौशल्या विकास योजनेला सुरुवात करण्यात आली. देशातील युवा वर्गाला संघटीत करुन त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार उपलब्ध करुन देणं हे या योजनेचं मुख्य उद्दीष्ट आहे.

केंद्राच्या या योजनेशी जास्तीत जास्त युवा पिढी जोडली जावी यासाठी युवांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची देखील व्यवस्था या योजनेत करण्यात आली. या योजनेसाठी तीन, सहा आणि एका वर्षाचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. यातील कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जातं आणि या प्रमाणपत्राला संपूर्ण देशभरात मान्यता असते.

फेब्रुवारी २०२१ पासून पंतप्रधान कौशल्या विकास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला (PMKVY 3.0) सुरुवात झाली आहे. या योजनेत ८ लाख युवांना स्किल ट्रेनिंग दिली जाणार आहे. यासाठी तब्बल ९४८.९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

कौशल्य विकास आणि उद्यमिता मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान कौशल्य विकास योजना देशातील २८ राज्य आणि ८ केंद्र शासित प्रदेशांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात युवांना व्यावसायिक ट्रेनिंग दिली जाईल. यामुळे उद्योगाशी निगडीत संधी त्यांना उपलब्ध होतील.

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेमध्ये तीन, सहा आण एक वर्ष असे रजिस्ट्रेशनचे पर्याय उपलब्ध असतात. यातील कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देखील दिलं जातं आणि त्यास संपूर्ण देशात मान्यता असते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. कोर्सचं शुल्क केंद्र सरकार भरतं. या योजनेत बहुतांश शिक्षण अर्धवट राहिलेल्या किंवा सोडलेल्या युवांना प्राधान्य दिलं जातं. कोणताही इच्छुक व्यक्ती http://pmkvyofficial.org येथे जाऊन योजनेसाठी अर्ज दाखल करू शकतो.

तंत्रशिक्षण घेण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स, हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फिटिंग, कंस्ट्रक्शनसारख्या जवळपास ४० तांत्रिक क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण घेऊ शकता. आपल्या आवडीचं क्षेत्र निवडून त्यातील प्रशिक्षण घेण्याची सुविधा येथे उपलब्ध होते.

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील आहेत. स्टूडंट हेल्पलाइन नंबर (Student Helpline) 88000-55555, स्मार्ट हेल्पलाइन नंबर (SMART Helpline) 1800-123-9626 आणि NSDC TP Helpline नंबर 1800-123-9626 यावर संपर्क करता येऊ शकेल. याशिवाय कौशल्य विकास योजनेचे अधिकृत संकेतस्थळ www.pmkvyofficial.org ला भेट देऊनही अधिक माहिती मिळवू शकता.

Read in English