२५ वर्षांपूर्वी 'स्वयंसेवक' म्हणून मोदींसोबत केला होता अमेरिका दौरा, आज घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 05:07 PM2019-05-30T17:07:35+5:302019-05-30T17:12:52+5:30

भाजपा आणि एनडीएच्या अभूतपूर्व यशाचे प्रमुख शिल्पकार नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या खासदारांमधील अनेक नावं, चेहरे आपल्या ओळखीचे आहेत. पण, यातला एक शिलेदार असा आहे, जो पंतप्रधान मोदींना ते संघ स्वयंसेवक असल्यापासून अगदी जवळून ओळखतो. या नेत्याचं नाव, जी. किशन रेड्डी. सिंकदराबाद मतदारसंघाचे खासदार असलेले रेड्डी आज मोदींसोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

तेलंगणमध्ये पहिल्यांदाच भाजपाचे चार खासदार विजयी झाले आहेत. या यशामध्ये जी. किशन रेड्डी यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्याचं बक्षीस म्हणूनच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं जातंय.

अगदी सामान्य कुटुंबातून आलेले जी. किशन रेड्डी हे संघाचे स्वयंसेवक होते. १९९४ मध्ये ते मोदींसोबत अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्याचे काही फोटो त्यांच्या वेबसाईटवरून मिळालेत.

शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले जी. किशन रेड्डी १९७७ मध्ये जनता पक्षाचे कार्यकर्ते झाले.

२००४ मध्ये रेड्डी यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि आंध्र प्रदेश विधानसभेत ते आमदार झाले. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्येही ते निवडून आले होते.

जी. किशन रेड्डी यांनी तीन वेळा संयुक्त आंध्र प्रदेशचे भाजपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. तसंच भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

आता नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात त्यांना कुठलं खातं दिलं जातं, हे पाहावं लागेल.