G20 मध्ये PM मोदींनी दाखवली 'अशी' ३ ठिकाणे; जी पाहून जागतिक नेत्यांना पडली भूरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:18 PM2023-09-13T12:18:12+5:302023-09-13T12:24:21+5:30

G20 च्या यशस्वी सांगतेनंतर केवळ देशातच नव्हे तर परदेशातही भारताचं कौतुक केले जात आहे. वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्यूचर या घोषवाक्यासह या संमेलनात भारताच्या संस्कृतीचं दर्शन घडवले. त्यात देशातील अनेक ऐतिहासिक ठिकाणे जगासमोर आली.

जी २० शिखर संमेलनाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीच्या प्रगती मैदानावर भारत मंडपम उभारण्यात आला होता. G20 साठी येणाऱ्या जगभरातील अनेक देशाच्या राष्ट्राध्यक्षांची, पंतप्रधानांनी बैठक याठिकाणी झाली, हा मंडपम सर्व सोयी सुविधांनी सज्ज होता.

पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्षांचे स्वागत करत होते, तेव्हा त्यांच्या पाठीमागे ऐतिहासिक फोटो होते. ज्याबद्दल हे पाहुण्यांना माहिती देत होते. ही ३ ठिकाणे पाहून जागतिक नेत्यांनाही भूरळ पडली. ही ठिकाणे कोणती याबाबत आपण जाणून घेऊया.

कोणार्क मंदिर – १३ व्या शतकाआधी गंगा राजवंशचे राजा नरसिम्हादेव यांनी कोणार्कच्या छोट्या शहरात या मंदिराची स्थापना केली होती. एक दशकाहून अधिक काळ हे मंदिर बनवण्यासाठी लागला. ज्यात वास्तू शिल्पकार, कुशल कारागिर यांचा समावेश होता. मंदिरातील वास्तू शिल्पे अनेकांना हैराण करतात. ओडिशातील वास्तू कलेचे यात दर्शन दिसते. यात मुख्य संरचनेत एक विशाल रथाचे डिझाईन करण्यात आले आहे.

कोणार्क सूर्य मंदिर हे एक यूनेस्कोच्या जागतिक ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. ज्यात अतिशय सुबक, सुंदर अशाप्रकारची वास्तूकला आणि दगडी कोरीव नक्षीकाम पाहायला मिळते. ओडिशातील रस्ते मार्गाहून, फ्लाईट आणि ट्रेनमार्गे तुम्ही सहज याठिकाणाला भेट देऊ शकता.

नालंदा विद्यापीठ – बिहारमध्ये असलेले नालंदा विश्वविद्यापीठ तक्षशिलानंतर जगातील दुसरी सर्वात प्राचीन विद्यापीठ आहे. ही जगातील पहिली निवासीय विद्यापीठ आहे. ५ व्या शतकात याचे निर्माण झाले होते तर ८०० वर्ष त्याचे अस्तित्व होते. याठिकाणी ९ मजली लायब्रेरी होती. ३ लाखाहून अधिक पुस्तके याठिकाणी होती.

या विद्यापीठात ३०० खोल्या होत्या, त्याठिकाणी मेरिटवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जायचा. मोफत शिक्षणासह जेवणही दिले जायचे. १० हजाराहून अधिक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी यायचे. इतकेच नाही तर परदेशातूनही याठिकाणी विद्यार्थी शिकायला यायचे. गुप्त वंशचे शासक सम्राट कुमारगुप्तने ५ व्या शतकात नालंदा यूनिवर्सिटीची स्थापना केली होती.

साबरमती आश्रम- गुजरातच्या अहमदाबाद इथं असलेले साबरमती आश्रम हे महात्मा गांधी, त्यांची पत्नी कस्तुरबा यांचे निवासस्थान होते. हा आश्रम साबरमती नदीने घेरलेला आहे. ही अशी जागा आहे ज्याठिकाणाहून गांधींनी दांडी यात्रेला सुरूवात केली होती.

साबरमती आश्रम याठिकाणी आज संग्रहालय आहे. गांधींजींची वेगवेगळी पत्रे, चित्रे या स्थानावर प्रदर्शित करण्यात आली आहेत. उपासना मंदिर, मगन निवास, विनोबा, नंदिनी आणि कुटीर आश्रमसारख्या अनेक गोष्टी इथे पाहायला मिळतात.

साबरमती आश्रम हे ऐतिहासिक स्थळ असून स्वातंत्र्य काळातील अनेक घटनांचे साक्षीदार आहे. जर तुम्हालाही या आश्रमाला भेट द्यायची असेल तर आणि भारताचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हे आश्रम लोकांसाठी सुरू असते.