स्ट्रेचरवर रुग्ण तडफडत होता, मदतीसाठी गयावया करणाऱ्या नातेवाईकांना डॉक्टरांनी केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 03:23 PM2021-04-18T15:23:46+5:302021-04-18T15:50:25+5:30

Doctors beating the patient's relatives : कोरोनाकाळात रुग्णांवर अखंड उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देवदूत मानले जात आहे. मात्र काही डॉक्टर याला अपवाद आहेत. डॉक्टरी पेशाला कलंकित करणारी एक घटना समोर आली आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात होत असलेल्या प्रचंड रुग्णवाढीमुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. या काळात रुग्णांवर अखंड उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देवदूत मानले जात आहे. मात्र काही डॉक्टर याला अपवाद आहेत. डॉक्टरी पेशाला कलंकित करणारी एक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये काही डॉक्टरांनी रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी विनंती करणाऱ्या नातेवाईकांना बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

ही घटना कानपूरमधील हेलट रुग्णालयात घडली आङे. हेलट रुग्णालयातील ज्युनियर डॉक्टर्सनी शनिवारी रुग्णाला दाखल करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना मारहाण केली. एवढेच नाही तर रुग्णाच्या नातेवाईकांचे मोबाईल हिसकावून घेत रुग्णाला दाखल करून न घेताच त्यांना हाकलून दिले.

हा रुग्ण स्ट्रेचरवर तडफडत होता. त्याचे नातेवाईक या रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करवून घेण्याची विनंती डॉक्टरांना करत होते. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना या प्रकाराचे चित्रिकरण मोबाईलमध्ये केले. मात्र डॉक्टरांनी हे चित्रिकरण मोबाइलमध्ये डिलीट केले. मात्र काही लोकांच्या मोबाइलमध्ये हे चित्रिकरण राहिले होते, ते आता व्हायरल होत आहे.

याबाबत जेव्हा अॅब्युलन्स ड्रायव्हरांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनीही डॉक्टरांनी केलेल्या गुंडगिरीचे वास्तव सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा कोरोना रुग्णांवरील उपचारांवेळी हे डॉक्टर कोरोना प्रोटोकॉल सांगून नातेवाईकांना दूर ठेवत होते. मात्र हेच लोक रुग्णाजवळ जाऊन नंतर नातेवाईकांना मारहाणही करू लागले.

घटनास्थळी उपस्थित असलेला अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर अजय याने सांगितले की, मोबाईल काढून घेण्यात आले होते. रुग्ण स्ट्रेचरवर होता. त्याला दाखल करून घेण्यावरून वादाला तोंड फुटले. दरम्यान हेलट रुग्णालयातील डॉक्टर आणि जिल्हा प्रशासनाने झाल्या प्रकाराबाबत मौन बाळगले आहे.