बलात्कारातील दोषी युवकाच्या पालकांनी 'अशी' केली मागणी; सरन्यायाधीश संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 09:17 PM2023-04-24T21:17:26+5:302023-04-24T21:22:52+5:30

सोमवारी सुप्रीम कोर्टात असे एक विचित्र प्रकरण समोर आले, ज्यावर वकिलाला सरन्यायाधीशांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. खरे तर हे प्रकरण बलात्काराच्या आरोपीशी संबंधित होते. या याचिकेतील मजकूर ऐकून सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड संतप्त झाले

सरन्यायाधीशांनी याचिकाही फेटाळून लावली. याचिकेत बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरलेल्या तरुणाच्या पालकांनी बलात्कारातून जन्मलेल्या बाळाचा ताब्यात देण्याची मागणी केली आहे. CJI यांनी संतप्त प्रतिक्रिया देत 'येथे येणाऱ्या याचिकांना काही मर्यादा आहे की नाही?

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड संतापलेले दिसले. त्यांच्यासमोर एका खटल्याची याचिका पोहोचली होती. हे विचित्र प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले.

उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील जाखनी खाल येथील एका तरुणाला बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. बलात्कारातील आरोपीच्या आईनं वकिलांच्या मदतीने ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

बलात्कारप्रकरणी दोषी ठरलेल्या या व्यक्तीची आई राखी देवी हिने न्यायालयात याचिका दाखल केली होती की, आपल्या मुलाने ज्या मुलीवर बलात्कार केला होता, त्या मुलीच्या पोटी जन्मलेले मूल तिच्या ताब्यात द्यावे अशी मागणी तिने केली होती.

या याचिकेचा विषय समजल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले. याचिका फेटाळताना ते म्हणाले की, येथे येणाऱ्या याचिकांना काही मर्यादा आहे की नाही? बलात्कार करणाऱ्याच्या आई-वडिलांची याचिका घेऊन त्याचे वकील अजय कुमार तळेसरा कोर्ट रूममध्ये पोहोचले होते.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नरसिंह यांच्या खंडपीठासमोर वकिलाने याचिका वाचून दाखवली तेव्हा सीजेआयने फटकारले आणि म्हणाले की, तुमचा मुलगा बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे आणि ते मूल (बलात्कारानंतर जन्मलेले) तुमच्याकडे सोपवावं असं तुम्हाला वाटतं?

यानंतर वकिलाने सांगितले की, ही विनंती बाळाच्या कल्याणासाठी आहे. यावर न्यायमूर्ती नरसिंह म्हणाले - तुम्ही काय बोलत आहात हे तुम्हाला माहीत आहे का? CJI चंद्रचूड म्हणाले- सर्वोच्च न्यायालयात येणाऱ्या याचिकांवर काही मर्यादा असायला हवी. ही याचिका फेटाळली आहे.