याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:41 IST2025-04-25T12:36:44+5:302025-04-25T12:41:05+5:30
India vs Pakistan War: भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तशीही पाकिस्तानने पाळली नव्हती. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानने या सीमेच्या मर्यादा ओलांडून भारतावर आक्रमण केले होते. परंतू, तरीही भारताने या रेषेची मर्यादा पार केली नव्हती.

पाकिस्तानने गुरुवारी भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध निलंबित केले आहेत. भारत आजवर एका करारामुळे शांत बसला होता. पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानच्या तावडीतून सोडविण्याच्या आड १९७२ मध्ये झालेला शिमला करार आड येत होता. त्यात एलओसी ला स्थायी सीमा करण्यात आले होते. आता पाकिस्तानने करार स्थगित करण्याचा निर्णय मागचा पुढचा विचार न करताच घेतला आहे, यामुळे भारताला जे हवे होते, तेच त्यांनी केले आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा तशीही पाकिस्तानने पाळली नव्हती. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानने या सीमेच्या मर्यादा ओलांडून भारतावर आक्रमण केले होते. परंतू, तरीही भारताने या रेषेची मर्यादा पार केली नव्हती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना हा करार झाला होता. बांगलादेश युद्ध हरल्यानंतर हा करार होता, तो इंदिरा सरकारला पीओके परत मिळविण्यासाठी संधीत परिवर्तित करता आला नव्हता, असे सांगितले जाते.
या शिमला करारानुसार भारताने सुमारे ९३ हजार पाकिस्तानी युद्धबंदींना सोडले होते. तसेच अन्यही काही अटी त्यात होत्या. पाकिस्तान तेव्हा झुकलेला होता, इंदिरा गांधी यांनी पीओकेवरून दबाव टाकला असता तरी पाकिस्तानसमोर दुसरा पर्याय नव्हता. परंतू, तसे झाले नाही. यामुळे जिंकून देखील भारत हरल्याची भावना लोकांत होती. ही बोचरी बाजू आज पाकिस्ताननेच बाजुला करत भारताच्या हातातील बेड्या तोडल्या आहेत.
पाकिस्तानने शिमला करार निलंबित केल्याचा अर्थ असा की आता कोणताही देश एलओसी मानण्यासाठी बाध्य नाही. म्हणजेच भारत आता एलओसी पार करून कोणतीही कारवाई करू शकतो. पाकिस्तानने तर यापूर्वीच केली होती, यामुळे त्यांनी या नियंत्रण रेषेची कोणतीच बुज राखली नव्हती. यामुळे पुन्हा त्यांनी ओलांडली तरी त्याचे फारसे महत्व राहणार नाही.
पाकिस्तानकडून काल आलेल्या प्रतिक्रियेनुसार एलओसी आता अस्तित्वात नाही. सिंधू नदीचे पाणी भारताने अडविल्याने ही युद्धाची घोषणा असल्याचे पाकिस्तान म्हणत आहे. तसेच आम्ही आमच्या अधिकाराचा वापर करणार असल्याचेही ते म्हणत आहेत. आता भारतालाही एलओसी पाळणे बंधनकारक राहिलेले नाही. यामुळे भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये आक्रमक रणनिती अवलंबू शकतो. भारत पीओकेच्या लोकांशी थेट संपर्क साधू शकतो. यामुळे तणाव वाढून त्याचा तोटा पाकिस्तानला जास्त होणार आहे.
शिमला करारच भारत-पाकिस्तानला शांतीपूर्ण चर्चेतून काश्मीरवर तोडगा काढण्यासाठी बाध्य करत होता. आता पाकिस्तानने स्वत:हूनच तो निलंबित केला आहे. यामुळे भारत आता काश्मीरमध्ये आपले नियंत्रण आणि निती आणखी ताकदीने अवलंबू शकणार आहे.
आणखी एक महत्वाची बाब म्हणजे भारत-पाकिस्तानमध्ये दोन अण्वस्त्र हल्ले रोखण्याबाबत करार झाले होते. कालच्या त्यांच्या घोषणेमुळे हे देखील स्थगित झाले आहेत. यामुळे जगाला पाकिस्तानने एकप्रकारे अण्वस्त्र हल्ल्याची धमकीच दिली आहे. बॅलेस्टिक मिसाईलच्या चाचणीची पूर्वसूचना देण्याबाबतही एक करार केलेला होता, तो देखील रद्द झाला आहे. यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच जाण्याची शक्यता आहे.