Odisha Railway Accident: चार ट्रॅक, तीन ट्रेन, अन् काही मिनिटांत मृत्यूचं तांडव, ओदिशामध्ये रेल्वे अपघात कसा झाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 05:53 PM2023-06-03T17:53:46+5:302023-06-03T18:07:57+5:30

Odisha Railway Accident: ओदिशामधील बालासोर येथे काल संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल शालीमार एक्स्प्रेस रुळांवरून उतरून मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. त्यानंतर यशवंतपूर हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस रुळांवरून घसरलेल्या डब्यांवर येऊन आदळली. त्यामुळे या अपघाताची तीव्रता अधिकच वाढली.

ओदिशामधील बालासोर येथे काल संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत २८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. कोरोमंडल शालीमार एक्स्प्रेस रुळांवरून उतरून मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. त्यानंतर यशवंतपूर हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस रुळांवरून घसरलेल्या डब्यांवर येऊन आदळली. त्यामुळे या अपघाताची तीव्रता अधिकच वाढली.

भारतीय रेल्वेचे कार्यकारी संचालक अमिताभ शर्मा यांनी सांगितले की, या अपघातामध्ये दोन प्रवासी ट्रेन आणि एक मालगाडी दुर्घटनाग्रस्त झाली. ही मालगाडी मुख्य रेल्वे मार्गाच्या बाजूला उभी होती.

२१ व्या शतकात भारतात झालेला सर्वात भीषण रेल्वे अपघात असलेला हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघात झाला तेव्हा अनेक प्रवासी झोपलेले होते. चेन्नईला जात असलेली कोरोमंडल शालीमार एक्स्प्रेस कथितपणे रुळावरून घसरली. त्यानंतर ही ट्रेन एका मालगाडीवर आदळली.

यानंतर यशवंतपूर हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस रुळावर आलेल्या डब्यांवर आदळली. टक्कर झाली तेव्हा तिथे असलेले अधिकारी आणि प्रत्यक्षदर्शीनी सांगितले की, संध्याकाळी सहा वाजून ५० मिनिटांपासून ७ वाजून १० मिनिटांदरम्यानच्या वेळात हा भीषण अपघात झाला.

दरम्यान, या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत असून, रेल्वेने तपासाचे आदेश दिले आहेत. येथे बचाव मोहीम रात्रभर सुरू होती. त्यात बचाव पथकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मृतदेह आणि जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली आहे.

या अपघातात ट्रेनची धडक एवढी जोरदार होती की, ट्रॅकवर पडण्यापूर्वी डबे हवेत वर उडाले. एक डबा दुसऱ्या डब्याच्या छतावर जाऊन पडला. या अपघातावरून अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. एका पाठोपाठ एक अपघात कसे झाले, असे विचारले जात आहे.

या अपघाताबाबत उपस्थित होत असलेल्या अनेक प्रश्नांदरम्यान, कोरोमंडल शालीमार एक्स्प्रेस आणि मालगाडी एकाच ट्रॅकवर कशा आल्या, असा प्रश्न विचारला जात आहे. हा तांत्रिक दोष होता की मानवी चूक, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. एकाच ठिकाणी तीन ट्रेन होत्या आणि त्यातील दोन एकमेकांवर धडकल्या, असाही दावा केला जात आहे. तसेच सिग्नल यंत्रणेच्या दोषामुळे हा अपघात झाल्याचाही दावा केला जात आहे.

एका प्रवाशाने सांगितले की, मी झोपलो होतो. ट्रेन रुळावरून उतरल्याचा आवाज ऐकून मी जागा झालो. अचानक १०-१५ लोकांचे मृतदेह पाहिले. त्यानंतर मी घाई गडबडीत डब्यातून बाहेर आलो. तिथेही मी अनेक मृतदेह पाहिले.