एटीएममधून 100च्या नोटा का मिळत नाहीत?, जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 16:25 IST2020-03-06T16:06:48+5:302020-03-06T16:25:28+5:30
ज्या एटीएममध्ये केवळ 100 रुपयांच्या नव्या नोटांचा कप्पा आहे, तिथे जुन्या ठेवता येत नाहीत व जिथे जुन्यांचा कप्पा आहे, तिथे नव्या ठेवणे शक्य नाही.

एटीएममधून 100 रुपयांच्या नोटा मिळत नाहीत आणि केवळ 200, 500 व दोन हजार रुपयांच्या नोटाच मिळतात, अशा अनेक ग्राहकांच्या तक्रारी आहेत व त्या खऱ्याही आहेत.
सध्या वापरात 100 रुपयांच्या दोन आकारांच्या नोटा असल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे उघड झाले आहे.
एटीएमच्या कप्प्यांत 100, 500 व दोन हजार रुपयांच्या नोटा ठेवण्यात येतात. त्यापैकी 500 व दोन हजार रुपयांच्या नोटांचे आकार ठरलेले आहेत. पण सध्या 100 रुपयांच्या जुन्या आणि नव्या नोटा असून, त्यांचे आकार वेगवेगळे आहेत.
ज्या एटीएममध्ये केवळ 100 रुपयांच्या नव्या नोटांचा कप्पा आहे, तिथे जुन्या ठेवता येत नाहीत व जिथे जुन्यांचा कप्पा आहे, तिथे नव्या ठेवणे शक्य नाही. त्यामुळे बँकांकडे 100 रुपयांच्या एकाच आकाराच्या म्हणजे नव्या नोटा असतील, तर त्या एटीएममध्ये ठेवल्या जातात. पण त्या अनेकदा पुरेशा नसतात. त्यामुळे त्या लवकर संपतात.
ज्या एटीएममध्ये जुन्या नोटांची व्यवस्था आहे, त्यांच्याबाबतही असेच घडते. परिणामी, एटीएममधून 100 रुपयांच्या पुरेशा नोटा मिळत नाहीत, असे आढळून आले आहे. तसेच विशिष्ट एटीएममध्ये कोणत्या आकाराच्या नोटा ठेवण्याची व्यवस्था आहे, ही माहिती बँकांकडे नाही.
नव्या नोटा 25% ठिकाणीच देशात असलेल्या सुमारे अडीच लाख एटीएमपैकी 25 टक्के एटीएममध्येच नव्या नोटांसाठीचा कप्पा आहे. उरलेल्या एटीएममध्ये 100 रुपयांच्या जुन्या म्हणजे आकाराने मोठ्या नोटा ठेवण्याची व्यवस्था आहे.
काहींना 100 च्या नोटा सहज मिळतात; पण अनेकांना त्या मिळतच नाहीत, असे हिताची इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रुस्तम इराणी यांनी सांगितले आहे.
एटीएम नेटवर्क प्रोव्हायडर्सना अनेकदा 100 रुपयांच्या नव्या आकाराच्या कमी नोटा उपलब्ध होतात. त्यामुळे प्रत्येक एटीएममध्ये त्या कमी प्रमाणात ठेवल्या जातात.
पाठवल्या गेलेल्या 100 रुपयांच्या नोटा एटीएममधील कप्प्यात मावत नसतील, तर त्या पुन्हा बँकेकडे येतात. परिणामी, त्या एटीएममध्ये 100 रुपयांच्या नोटा ठेवल्याच जात नाहीत.