'नेटवर्क्ड ब्लू वॉटर फोर्स'..! २०० हून अधिक युद्धनौका, पाणबुड्यांसह भारतीय नौदलाचा जबरदस्त प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 11:08 IST2025-09-08T11:01:49+5:302025-09-08T11:08:32+5:30

भारत सातत्याने सागरी क्षेत्रावर आणखी मजबूत आणि अत्याधुनिक देश बनत आहे. बदलत्या परिस्थितीनुसार, प्रत्येक देशाच्या सागरी क्षेत्राचं महत्त्व वाढले आहे. तेच लक्षात ठेवत भारतीय नौदलाने आता अधिक शक्तिशाली आणि नेटवर्क्ड ब्लू-वॉटर फोर्स बनवण्याचं लक्ष केंद्रित केले आहे.

२०३५ पर्यंत भारतीय नौदलाकडे २०० हून अधिक युद्धनौका आणि पाणबुडी असतील, जेणेकरून सागरी क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी भारताला अधिक ताकदवान बनवले जाईल. त्याशिवाय चीन-पाकिस्तान यांच्याकडून निर्माण होणाऱ्या कुठल्याही आव्हानांचा सामना करता येईल.

सध्या भारतीय शिपयार्डमध्ये ५५ मोठे आणि छोट्या युद्धानौका बनवण्याचं काम सुरू आहे. ज्यासाठी एकूण ९९,५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. सोबतच नौदलला स्वदेशी बनावटीच्या ७४ नवीन युद्धनौका आणि जहाज बनण्यासाठी अडीच लाख कोटींच्या प्रस्तावाला आधीच मंजुरी मिळाली आहे.

यात ९ डिझेल आणि इलेक्ट्रिक पाणबुडी, ७ मल्टी रोल स्टेल्थ फ्रिगेट, ८ अँन्टी सबमरीन वॉरफेअर कोरवेट, १२ माइन काउंटरमेजर जहाजांचा समावेश आहे. त्याशिवाय पुढील पिढीतील ४ खतरनाक युद्धनौका आणि स्वदेशी एअरक्राफ्ट कॅरिअर बनवण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे, जे सध्या मूळ रशियन असलेल्या आयएनएस विक्रमादित्यची जागा घेऊ शकते.

एक मजबूत नौदल रातोरात बनू शकत नाही. त्यासाठी अनेक वर्षांची योजना आणि त्यादृष्टीने पाऊले उचलण्याची गरज असते. सध्याच्या घडीला अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन याशिवाय भारत असा देश आहे जो स्वदेशी पातळीवर एअरक्राफ्ट कॅरिअर आणि अण्वस्त्र संचालित बॅलेस्टिक मिसाइल पाणबुडी बनवू आणि चालवू शकतो असं एका नौदल अधिकाऱ्याने सांगितले. TOI वृत्तपत्रात हा रिपोर्ट आला आहे.

सध्या नौदलाकडे १४० युद्धनौका आहेत. ज्यातील १७ डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी बहुतांश जुन्या झाल्या आहेत. यामध्ये दोन अणुऊर्जेवर चालणाऱ्या एसएसबीएनचा समावेश आहे. याशिवाय नौदलाकडे २५० हून अधिक विमाने आणि हेलिकॉप्टर आहेत. जुन्या पाणबुड्या आणि युद्धनौका टप्प्याटप्प्याने बंद करताना पुढील दशकात २०० हून अधिक युद्धनौका आणि पाणबुड्यांसह ३५० नौदल विमाने आणि हेलिकॉप्टरची क्षमता विकसित करण्याचे नौदलाचे उद्दिष्ट आहे. २०३७ पर्यंत ही संख्या २३० युद्धनौकांपर्यंत पोहोचू शकते.

दुसरीकडे ३७० युद्धनौका आणि पाणबुड्यांसह जगातील सर्वात मोठे नौदल बनवून चीन हिंद महासागर क्षेत्रात आपलं वर्चस्व सातत्याने वाढवत आहे. आफ्रिकेतील जिबूती, पाकिस्तानातील कराची आणि ग्वादर आणि कंबोडियातील रीम सारख्या तळांनंतर बीजिंग अधिक परदेशी तळांच्या शोधात आहे. चीन पाकिस्तानला त्यांची नौदल शक्ती वाढवण्यासाठी देखील मदत करत आहे.

पाकिस्तानकडे सध्या पाच जुन्या अगोस्टा श्रेणीच्या पाणबुड्या आहेत, परंतु पुढील वर्षापासून त्यांना आठ नवीन युआन किंवा हँगोर श्रेणीच्या डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या मिळण्यास सुरुवात होईल, ज्यामध्ये एअर-इंडिपेंडंट प्रोपल्शन (AIP) तंत्रज्ञान असेल आणि त्या बराच काळ पाण्याखाली राहू शकतील. यामुळे समुद्रात लढण्याची पाकिस्तानची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल.

भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे आपली पारंपारिक पाणबुडी क्षमता हळूहळू कमी होत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) आणि जर्मन कंपनी थायसेनक्रुप मरीन सिस्टम्स (TKMS) यांच्यात ७०,००० कोटी रुपयांच्या सहा नवीन डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांच्या बांधकामासाठी वाटाघाटी झाल्या आहेत.

यामध्ये AIP तंत्रज्ञान आणि जमिनीवर हल्ला करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश असेल. त्याच वेळी ३२,००० कोटी रुपये खर्चाच्या आणखी तीन फ्रेंच-मूळ स्कॉर्पिन पाणबुड्या उत्पादन करण्याची योजना सध्या आहे. सध्या भारतीय नौदलाकडे सहा स्कॉर्पिन पाणबुड्या, सात जुन्या रशियन किलो क्लास आणि चार जर्मन HDW पाणबुड्या आहेत.