By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:09 IST
1 / 11चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्याच तिमाहीत सरकारने इतकी वसुली केली आहे, जी पाहून आर्थिक तज्ज्ञही थक्क झाले आहेत. याच वेगाने वसुली सुरू राहिली, तर यंदा टोल कलेक्शनचा नवा इतिहास रचला जाईल, अशी चिन्हे आहेत.2 / 11रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ मध्ये वर्षभरात एकूण ६१,४०८ कोटी रुपयांचा टोल वसूल झाला होता. २०२५-२६ च्या पहिल्या तीन महिन्यांतच ५०,३४५ कोटी रुपये जमा झाले आहेत.3 / 11हे कलेक्शन गेल्या वर्षीच्या एकूण वसुलीच्या तब्बल ८२ टक्के आहे. याचाच अर्थ, गेल्या वर्षभराची कमाई सरकारने यंदा केवळ काही महिन्यांतच मिळवली आहे.4 / 11गेल्या ५ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास, २०२१ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत सरकारने टोलच्या माध्यमातून २.७८ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०२१ मध्ये टोल कलेक्शन २७,९२७ कोटी होते, जे २०२५ पर्यंत १२० टक्क्यांनी वाढले आहे.5 / 11केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, महामार्गांची वाढलेली लांबी, वाढती वाहने आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनमुळे ही वाढ झाली आहे. पूर्वी टोल प्लाझा पार करण्यासाठी एका गाडीला सरासरी १२.२३ मिनिटे लागायची, आता फास्टॅगमुळे हे काम केवळ ४० सेकंदात होत आहे.6 / 11टोल वसुलीच्या बाबतीत राजस्थान देशात अव्वल स्थानी आहे. २०२०-२१ मध्ये या राज्याचे टोल कलेक्शन सुमारे ३,३३० कोटी रुपये होते, जे २०२४-२५ मध्ये वाढून ६,२८९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या पाच वर्षांत राजस्थानने एकूण २४,३१० कोटी रुपयांचा टोल जमा केला आहे.7 / 11उत्तर प्रदेशने टोल वसुलीत मोठी झेप घेतली आहे. २०२१ मधील ३,०८७ कोटी रुपयांची वसुली २०२५ मध्ये थेट ६,५७४ कोटी रुपयांवर गेली आहे. पाच वर्षांचा विचार करता, उत्तर प्रदेशच्या तिजोरीत एकूण २३,९०० कोटी रुपये टोलच्या माध्यमातून जमा झाले आहेत.8 / 11टोल टॅक्स जमा करण्यात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये महाराष्ट्राचे टोल उत्पन्न २,५९१ कोटी रुपये होते. महाराष्ट्रात टोलचे उत्पन्न गेल्या पाच वर्षात दुपटीपेक्षा जास्त वाढले असून २०२५ मध्ये ते ६,१०३ कोटींवर पोहोचले आहे.9 / 11औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेल्या गुजरातमध्येही टोल वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. २०२१ मध्ये गुजरातचे कलेक्शन २,७२१ कोटी रुपये होते, जे २०२५ मध्ये वाढून ५,४५० कोटी रुपये झाले आहे. महामार्गांचे मोठे जाळे हे या वाढीचे मुख्य कारण आहे.10 / 11तामिळनाडू राज्य इतर चार राज्यांच्या तुलनेत थोडे मागे असले तरी, तिथल्या वसुलीत सातत्य आहे. २०२१ मध्ये तामिळनाडूचा टोल महसूल २,३३३ कोटी रुपये होता, जो २०२५ मध्ये ४,४५९ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.11 / 11ज्या राज्यांमध्ये महामार्गांचे जाळे दाट आहे, तिथे टोल वसुली सर्वाधिक आहे. उद्योग आणि वाहनांची मोठी वर्दळ या पाच राज्यांच्या उत्पन्नाचे मुख्य कारण आहे. मात्र, सरकारने ज्या वेगाने टोल वाढवला आहे, त्याच प्रमाणात महामार्गांवर सोयी-सुविधा आणि सुरक्षितताही वाढवावी, अशी अपेक्षा वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.