CoronaVaccine: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले,आता मास्क काढायचा का?; AIIMSच्या डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 02:16 PM2021-05-15T14:16:49+5:302021-05-15T14:50:47+5:30

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना मास्क परिधान नाही केले तरी चालेल, असं अमेरिकामधील सरकारने म्हटलं आहे.

देशातील कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूदरात अजूनही वाढ सुरुच आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 3,26,098 नव्या रुग्णसंख्येची भर पडली असून 3890 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी 3,53, 299 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.

शुक्रवारपर्यंत देशात 18 कोटी 4 लाख 57 हजार 579 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. शुक्रवारी एकाच दिवसात 11 लाख 3 हजार 625 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 31.30 कोटीहून जास्त कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा तुडवडा अद्यापही जाणवत आहे. कोरोना लसींच्या कमतरतेमुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम पडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता केंद्राकडून राज्यांना 1.92 कोटी लसींचे डोस देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिलासादायक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 16 मे ते 31 मे या कालावधीत राज्यांना 1.92 कोटी लसींचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनी मास्क परिधान नाही केले तरी चालेल, असं अमेरिकेच्या सरकारने तेथील स्थानिक नागरिकांना म्हटलं आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर भारतात देखील कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मास्क काढायचा का, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. मात्र अमेरिकेप्रमाणे सध्या भारतातील वातावरण तसं नाही. त्यामुळे भारतात जरी दोन्ही डोस घेतले असतील,तरी मास्क लावणं आवश्यक असल्याचं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही भारतात मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे, असं डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचं नवं रुप समोर येत आहे. त्यातच म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. त्यामुळे जसं अमेरिकेत मास्क उतरवला आहे, तसं भारतात अजिबात करु नका, असं गुलेरिया यांनी म्हटलं.

दरम्यान,ऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये भारत आणि भारतीयांसाठी 216 कोटी लसींचे उत्पादन करण्यात येईल. त्यामुळे कोरोनावरील लस ही सर्वांसाठी उपलब्ध होईल यात शंका नाही, असा विश्वासही व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केला. आतापर्यंत भारतात जवळपास 18 कोटी लसी दिल्या गेल्या आहेत. तर अमेरिकेमध्ये आतापर्यंत 26 कोटी डोस देण्यात आले आहेत. तर या क्रमवारीत चीन दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून 1.92 कोटी लसींचे डोस पुरवले जाणार आहे. यापूर्वी देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. देशातील कोरोना लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Read in English