1 / 10उत्तर प्रदेशात गांधी कुटुंबाचा गड मानल्या जाणाऱ्या रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघातून अखेर काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. रायबरेलीतून राहुल गांधी तर अमेठी मतदारसंघातून किशोरी लाल शर्मा यांना काँग्रेसनं उमेदवारी घोषित केली आहे.2 / 10शुक्रवारी हे दोन्ही उमेदवार अर्ज दाखल करतील ज्याची पूर्ण तयारी काँग्रेसनं केली आहे. प्रियंका गांधी निवडणूक लढणार नाही. मग राहुल गांधींनी अमेठी मतदारसंघाऐवजी रायबरेली या मतदारसंघाची निवड का केली याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. 3 / 10अमेठी आणि रायबरेली मतदारसंघ गांधी कुटुंबाचा पारंपारिक गड मानला जातो. मागील निवडणुकीत अमेठीतून भाजपाच्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना मात दिली होती. यंदा पुन्हा स्मृती इराणी मैदानात आहेत. यंदा त्यांच्याविरोधात राहुल गांधी ऐवजी किशोरी लाल शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.4 / 10राहुल गांधी यंदा आई सोनिया गांधी आणि आजी इंदिरा गांधी यांच्या मतदारसंघातून नशीब आजमावणार आहेत. राहुल गांधी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघातून उभं राहणं यामागे काँग्रेसनं विचार करून आखलेली रणनीती असल्याची चर्चा आहे.5 / 10राहुल गांधींना अमेठीऐवजी रायबरेलीतून निवडणुकीला उभं करण्यामागे निवडणुकीत पराभवाची भीती नव्हे तर भाजपाच्या रणनीतीला छेद देण्याची खेळी आहे. २०२४ च्या निवडणुकीचं वातावरण राहुल विरुद्ध मोदी असं दिसत आहे. अशातच जर अमेठीतून ते मैदानात उतरले तर राहुल विरुद्ध स्मृती इराणी असं वातावरण तयार केले जाईल. 6 / 10अशाप्रकारचा वातावरण तयार होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाने राहुल गांधींना अमेठीतून तिकीट न देता रायबरेली येथून उभे केले आहे. जर अमेठीतून राहुल गांधींना उमेदवारी दिली नसती तर मजबुरीने प्रियंका गांधींना रायबरेलीतून तिकिट द्यावं लागले असते. प्रियंका गांधी या निवडणूक लढवण्यास इच्छुक नाहीत. जर त्या उभ्या झाल्या तर भाजपाला घराणेशाहीवरून काँग्रेसला घेरण्याची आयती संधी मिळेल. 7 / 10इतकेच नाही तर राहुल गांधी, प्रियंका गांधी जर दोघेही निवडणुकीत उभे राहिले तर दोघांना आपापल्या मतदारसंघात प्रचारात व्यस्त व्हावं लागले असते. अशात देशातील अन्य भागात पक्षाच्या प्रचार अभियानासाठी दोन्ही नेत्यांना कमी वेळ मिळाला असता. त्यामुळे प्रियंका गांधींनी देशभरात प्रचारात लक्ष देण्यासाठी निवडणुकीतून माघार घेतली. 8 / 10काँग्रेसच्या रणनीतीप्रमाणे राहुल गांधींना रायबरेलीतून उतरवलं आहे. कारण त्यांच्यावर राज्य सोडून पळाल्याचा आरोप होऊ नये. प्रियंका गांधी या सर्वत्र प्रचारासाठी उपलब्ध होतील. घराणेशाहीच्या आरोपावरूनही मोदी-भाजपा यांना सडेतोड उत्तर देता येईल. त्यामुळे भाजपाला काँग्रेसविरोधात मुद्दे सापडू नये यासाठी काँग्रेसनं रायबरेलीतून राहुल गांधींना मैदानात उतरवलं. 9 / 10मागील ४ महिन्यापासून स्मृती ईराणी यांनी अमेठीत ठाण मांडलं आहे. जर याठिकाणी राहुल गांधी पुन्हा पराभूत झाले तर गांधी कुटुंबाच्या राजकीय प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे उत्तर भारतातील राजकारणात राहुल गांधींच्या राजकीय वर्चस्वाला धक्का बसेल. त्यामुळे राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी देण्यात आली आहे.10 / 10अमेठी ऐवजी रायबरेली देण्यामागची आणखी एक रणनीती म्हणजे, राहुल गांधी जर दोन्ही जागांवर निवडून आले तर एका जागेवर राजीनामा द्यावा लागेल. रायबरेली अथवा वायनाड या दोघांपैकी एका जागेवर राजीनामा दिल्यास त्याठिकाणी पर्यायी उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांचा विचार केला जाईल. राहुल गांधी वायनाड सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रायबरेलीत पोटनिवडणूक झाल्यास प्रियंका गांधीही खासदार बनू शकतात असा विश्वास नेत्यांना आहे.