लेडी सिंघम श्रेष्ठा ठाकुरही फसल्या! आयआरएस अधिकारी असल्याचे सांगून भामट्याने केले लग्न, दोन वर्षे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 08:24 PM2024-02-11T20:24:08+5:302024-02-11T20:32:59+5:30

DSP Shrestha Thakur Story: लग्नानंतर या महिला पोलीस अधिकाऱ्याला तिच्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आले होते. परंतु याला खूप उशिर झाला होता.

अनेकदा मॅट्रीमोनिअल साईटवर खोटी माहिती देऊन मुला, मुलींना लग्नात फसविल्याची कित्येक प्रकरणे समोर येतात. परंतु एखाद्या लेडी सिंघम असलेल्या डीवायएसपी महिलेसोबत असा प्रकार झाला असेल तर... उत्तर प्रदेशमध्ये तैनात असलेल्या डेप्युटी एसपी श्रेष्ठा ठाकुर यांना एका व्यक्तीने आयआरएस अधिकारी असल्याचे भासवून लग्न करत फसविले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक, खळबळजनक असा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर या महिला पोलीस अधिकाऱ्याला तिच्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात आले होते. परंतु याला खूप उशिर झाला होता.

पती बोगस असल्याचे समजताच तिच्या पायाखालची वाळू सरकली होती. तिने या व्यक्तीपासून घटस्फोट मिळविला. तरी हा व्यक्ती तिच्या नावावर लोकांकडून पैसे वसूल करत होता. आता तिने गाझियाबादमध्ये माजी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

श्रेष्ठा ठाकुर या सध्या शामली जिल्ह्यात तैनात आहेत .२०१८ मध्ये त्यांचे लग्न रोहित राज नावाच्या व्यक्तीशी झाले होते. एका मॅट्रिमोनअल साईटवर त्यांची ओळख झाली होती. रोहितने २००८ च्या बॅचचा आयआरएस अधिकारी असल्याचे सांगितले होते. रांचीमध्ये उपायुक्त असल्याचेही सांगितले होते. श्रेष्ठा ठाकुर यांच्या नातेवाईकांनी याची चौकशीही केली होती. तेव्हा रोहित राज नावाचा व्यक्ती खरोखरच आयआरएस अधिकारी असल्याचे त्यांना समजले होते.

एकसारखे नाव असल्याचा फायदा आरोपीने घेतला होता व श्रेष्ठा ठाकुर यांच्यासोबत धुमधडाक्यात लग्न केले होते. यानंतर जेव्हा श्रेष्ठा ठाकुर यांना पतीबाबत खरे समजले तेव्हा त्यांना धक्का बसला होता.

परंतु लग्न टिकवायचे होते, समाजासमोरही जायचे होते म्हणून त्यांनी नमते घेत संसार सुरु ठेवला होता. परंतु पती फसवणूक करायचे प्रकार करायला लागला. तिच्या नावावर अनेकांकडून पैसे वसूल करू लागला तेव्हा त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. तोवर लग्नाला दोन वर्षे झाली होती.

घटस्फोटानंतरही या भामट्याने लोकांची फसवणूक करणे सोडले नाही. महिला पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती असलेल्या जिल्ह्यांमध्ये जाऊन लोकांची फसवणूक सुरुच ठेवली. सध्या तो गाझियाबादच्या कौशांबी पोलीस स्टेशन परिसरात राहत होता. तो लोकांना आपल्या नावाने फसवत असल्याचे पाहून श्रेष्ठा ठाकुर यांनी अखेर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

पैशांच्या फसवणुकीची बाबही समोर आली आहे. आरोपीने महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये घेतले आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.