...तर कामाचे तास 'इतके' वाढणार; मोदी सरकार मोठा निर्णय घेणार?

By कुणाल गवाणकर | Published: November 22, 2020 11:19 PM2020-11-22T23:19:09+5:302020-11-22T23:24:03+5:30

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर लाखो लोकांना पगार कपातीचा सामना करावा लागला.

कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका अर्थव्यवस्थेला बसला. कोरोनाच्या धक्क्यातून देशाची अर्थव्यवस्था अद्यापही सावरलेली नाही.

देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. लवकरच कामगारांच्या कामांच्या तासांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ तासांवरून १२ तास करण्याचा सरकारचा विचार आहे. कामगार मंत्रालयानं नुकताच संसदेला याबद्दलचा प्रस्ताव दिला आहे.

कामगार मंत्रालय सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती नियम २०२० मध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीचा प्रस्ताव श्रम मंत्रालयानं तयार केला आहे.

१२ तासांच्या कामात मधल्या ब्रेकचादेखील समावेश असेल. या प्रस्तावात आठवड्याच्या कामाचे तास ४८ असतील, असं नमूद करण्यात आलं आहे. सध्याच्या नियमानुसार आठवड्याचे तास अठ्ठेचाळीसच आहेत.

कामाच्या तासात वाढ केल्यानं ओव्हरटाईमचा भत्ता मिळेल. त्यामुळे अधिकचा भत्ता मिळून त्यांची कमाई वाढेल, अशी माहिती कामगार मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्यानं दिली.

आठ तासांपेक्षा अधिक काम केल्यास सर्व कामगारांना ओव्हरटाईम मिळू शकेल, अशी तरतूद नव्या प्रस्तावात करण्यात आली आहे.

१५ ते ३० मिनिटांचा ओव्हरटाईम केल्यास तो ३० मिनिटं मोजण्यात येईल, अशी तरतूद नव्या प्रस्तावात आहे. सध्या भत्ता मिळवण्यासाठी किमान ३० मिनिटांचा ओव्हरटाईम आवश्यक आहे.