आपण सकाळपासून रात्रीपर्यंत किती 'मेड इन चायना' वस्तू वापरतो; माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:01 PM2020-06-08T17:01:57+5:302020-06-08T17:08:56+5:30

चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे जगासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. चीन या संकटातून बाहेर आला असला तरी इतर अनेक देश अजूनही कोरोनाशी दोन हात करत आहेत.

चीननं कोरोना पसरवला, असा आरोप अनेक देशांनी केला आहे. त्यामुळे चीनच्या सामानावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. भारतातही ही मागणी जोर धरू लागली आहे.

चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केलं. या आवाहनाला अनेकजण सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.

आपण सकाळपासून रात्रीपर्यंत दिवसभर चिनी वस्तूंचा वापर करतो. घरी, ऑफिसमध्ये सगळीकडे वापरत असलेल्या बहुतांश वस्तू चीनमध्ये तयार होतात.

सकाळी आपण दात घासतो. त्यासाठी वापरली टूथब्रश वापरतो. टूथब्रशचा ब्रँड जरी भारतीय असला, तरी त्याचं उत्पादन चीनमध्ये झालेलं असतं. टूथपेस्टचंही तेच. अनेक कंपन्या टूथपेस्टसाठी वापरली जाणारी पावडर चीनमधूनच मागवतात.

बाथरूममधील बऱ्याचशा प्लास्टिकच्या वस्तू चीनमध्येच तयार होतात. शॅम्पूपासून साबणापर्यंतचा कच्चा माल चीनमधूनच येतो.

किचनमध्ये वापरली जाणारी मेलामाईनची भांडी आणि इतर वस्तू चीनमधूनच मागवल्या जातात. बरेचसे व्यापारी या वस्तूंवर भारतीय ब्रँड्सचा शिक्का मारतात.

ऑफिसमध्ये वापरले जाणारे बरेचसे लॅपटॉप, डेस्कटॉप चीनमध्येच तयार होतात. प्रिंटरसह वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऍक्सेसरीजची निर्मितीदेखील चीनमध्येच होते.

आपण दिवसभर स्मार्टफोन्सचा वापर करतो. भारतीय बाजारात सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन्स चिनी कंपन्यांचे आहेत.

रात्री झोपण्याआधी अनेक जण टीव्ही पाहतात. भारतातील ९० टक्के एलसीडी, एलईडी, स्मार्ट टीव्हीच्या किट चीनमधूनच येतात.

भारतीय सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूदेखील चीनमधूनच येतात. दिवाळीतील लक्ष्मी गणेशाच्या मूर्ती, दिव्यांची तोरणं चीनमध्येच तयार होतात. होळीच्या पिचकाऱ्या, रंगदेखील चीनमध्येच तयार होतात.

गेल्या दोन दशकांमध्ये भारतातील अनेक कारखाने बंद झाले. त्यानंतर भारतीय व्यापाऱ्यांनी चीनमध्ये तयार होणाऱ्या वस्तूंचा पर्याय निवडला. या वस्तू स्वस्तात उपलब्ध असल्यानं व्यापाऱ्यांना फायदा होऊ लागला.