Bageshwar Baba: कोण आहेत बागेश्वर बाबा? चमत्काराचं आव्हान स्वीकारलं अन् दिव्यदृष्टीने मनातलं ओळखतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 01:46 PM2023-01-21T13:46:29+5:302023-01-21T13:52:02+5:30

Bageshwar Baba: चमत्कार सिद्ध करून दाखवल्यास ३० लाख रुपयांच्या बक्षीसाचे आव्हान स्वीकारणारे बागेश्वर बाबा कोण आहेत? जाणून घ्या...

देशात आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. केंद्रातील मोदी सरकारला विविध विषयांवरून घेरण्याचा विरोधकांचा सातत्याने प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. यातच आता सर्वच पक्षांनी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. यातच बागेश्वर बाबा अचानक चर्चेत आले आहेत. (Bageshwar Baba)

दिव्यदृष्टीने पाहिजे त्या गोष्टी ओळखतो, असा दावा करणारे बागेश्वर बाबा सध्या भलतेच चर्चेत आहेत. बागेश्वर बाबा यांना नागपूरमध्ये येऊन दरबार भरवला. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष श्याम मानव यांनी त्यांना थेट चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हानच दिले. चमत्कार करून दाखवला तर ३० लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे श्याम मानव यांनी जाहीर केले.

विशेष म्हणजे बागेश्वर बाबा यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. पण त्यांनी एक अट ठेवलीय. ते म्हणजे नागपूरला येऊन चमत्कार करून दाखवणार नाही. तर रायपूरला तुम्हालाच यावे लागेल, असे बागेश्वर बाबाने म्हटले आहे. चमत्काराचे आव्हान स्वीकारणारे बागेश्वर बाबा नेमके कोण आहेत, ते जाणून घेऊया...

बागेश्वर बाबांचा जन्म ४ जुलै १९९६ मध्ये झाला. छतरपूर जिल्ह्यातील गढा गावात बागेश्वर बाबांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामकृपाल गर्ग आणि आईचे नाव सरोज गर्ग आहे. त्यांना तीन मुले आहेत. त्यामध्ये बागेश्वर हे सर्वांत मोठे आहेत. बागेश्वर यांचे बालपण गरिबीत गेले.

बागेश्वर उर्फ धीरेंद्र कृष्ण यांनी १२ वीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांनी हळूहळू वडिलांप्रमाणेच कथा वाचन करण्यास सुरुवात केली. माझे वडील मला शिक्षणासाठी वृंदावनला पाठवू शकले नाहीत. कारण त्यांच्याकडे त्यावेळी एक हजार रुपये नव्हते, असे बागेश्वर बाबा सांगतात.

छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर दाम हनुमान मंदिरात रोज हजारो भाविक येत असतात. याच धामचे पुजारी आणि कथावाचक पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री अचानक प्रसिद्धीस आले आहेत. हेच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजे बागेश्वर बाबा होय.

त्यांच्या गावात हनुमानाचे मंदिर आहे. याच मंदिरात त्यांचे आजोबा भगवानदास गर्ग यांची समाधी आहे. त्यांचे आजोबा सिद्धपुरुष होते. आजोबांचा आशीर्वाद आणि तपश्चर्येमुळे आपल्यालाही भविष्य सांगण्याची सिद्धी प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बागेश्वर बाबा आपल्या दरबारात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बोलावतात, तो व्यक्ती जवळ येईपर्यंत त्याचे नाव, पत्ता एका चिठ्ठीवर लिहून देतात. एवढेच नव्हे तर भर दरबारात बाबा त्या व्यक्तिच्या समस्याही सांगतात, असा दावा बागेश्वर बाबांचे भक्त करतात.

बागेश्वर बाबा यांच्या या दाव्यामुळेच ते सातत्याने वादात असतात. आता श्याम मानव यांनीही त्यांना हा चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. हा चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे आव्हान दिले आहे. बागेश्वर बाबा यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.