शाब्बास पोरी! लेकीला पोलिसांच्या गणवेशात पाहायचं वडिलांचं होतं स्वप्न; ती झाली IPS अधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 04:05 PM2023-07-08T16:05:22+5:302023-07-08T16:10:09+5:30

IPS Pooja Awana : पूजा नेहमी अभ्यासात टॉप करायची. वडील विजय अवाना यांना आपल्या मुलीला पोलिसांच्या गणवेशात पाहायचे होते.

पूजा अवानाची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. IPS पूजा अवाना ही मूळची नोएडातील अट्टा गावची आहे. पूजा नेहमी अभ्यासात टॉप करायची. वडील विजय अवाना यांना आपल्या मुलीला पोलिसांच्या गणवेशात पाहायचे होते.

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूजा आयपीएस झाली. तिचा हा यशस्वी प्रवास अनेकांना प्रेरणा देतो. पूजा अवाना गुर्जर समाजातील आहे. पोलीस सेवेतील तिची निवड गुर्जर समाजातील तरुणांना खूप प्रेरणा देते.

पहिल्याच प्रयत्नात अपयश, कमी गुण किंवा यश न मिळाल्याने खचून जाऊ नका, तुमच्या ध्येयावर ठाम राहा आणि तुमच्या स्वप्नांनुसार कठोर परिश्रम करा, असं पूजाने म्हटलं आहे. यावेळी नाही तर पुढच्या वेळी यश तुमच्यापासून दूर राहणार नाही.

2010 मध्ये भारतीय पोलीस सेवेसाठीचा तिचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. ती पहिल्यांदा पास झाली नाही पण हिंमत हारली नाही. सतत कष्ट करण्याची तिची तयारी होती. तिने आपला अभ्यास सुरूच ठेवला.

दुसऱ्या प्रयत्नात तिने 316 वा रँक मिळवला आणि आज आयपीएस अधिकारी म्हणून ती तरुणांमध्ये रोल मॉडेल बनली आहे. मे 2019 मध्ये तिचे शब्द लोकांसाठी प्रेरणादायी ठरले. तिची एक फेसबुक पोस्टही व्हायरल झाली होती.

पूजा अवाना तिची प्रेरणादायी फेसबुक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणार्‍या पोस्ट आणि पोलिसांच्या गणवेशातील फोटो शेअर करण्यात आले.

पूजा अवानाची त्यानंतर मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये डीसीपी म्हणून नियुक्ती झाली. ती जयपूरची पोलीस आयुक्त आहे आणि 2012 बॅचची IPS आहे. तिच्यापासून अनेकांना काहीतरी नवं करण्याची प्रेरणा मिळत आगे.

पूजाने विद्यार्थ्यांना त्यांची ताकद आणि कमकुवतपणा ओळखण्यास सांगितले. तुमच्या क्षमतेनुसार विषय निवडा. ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा असं मोलाचा संदेश दिला आहे.

क्रीडा, सांस्कृतिक, संरक्षण, पोलीस सेवा किंवा शैक्षणिक, प्रत्येक ध्येयासाठी उत्कट इच्छा असणे आवश्यक आहे. अभ्यासासोबतच आपल्या छंदांनाही वेळ द्या असंही पूजा अवाना हिने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.