International Tea Day: मोदींनी चहा विकलेल्या टपरीचं होतंय पर्यटनस्थळ, सध्या तिथं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 02:46 PM2022-05-21T14:46:36+5:302022-05-21T15:01:19+5:30

नरेंद्र मोदींच्या चहा विकण्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर अनेकदा टीकाही केली आहे. मात्र, खरंच नरेंद्र मोदी चहा विकायचे की नाही, याबाबत त्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी यापूर्वी सांगितले आहे.

जगभरात 21 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा केला जातो. चहा म्हणजे तरतरी, चहा म्हणजे चर्चेचं ठिकाण आणि चहा म्हणजे गप्पा गोष्टी. म्हणून चहा हे पेय जगप्रसिद्ध आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहानपणी चहा विकला होता. चहा विकणाराही या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे मोदींनी आपल्या कार्यकर्तृत्त्वातून दाखवून दिलं.

मोदींनी ज्या ठिकाणी चहा विकला, तेथील चहाची टपरी आता पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याची योजना करण्यात आली आहे.

केंद्रीय पर्यटन आणि संस्कृतीकमंत्री प्रल्हाद पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडनगर शहरात गेले होते. त्यावेळी त्यांनी या टपरीला आगामी काळात पर्यटनस्थळ म्हणून विकास करता येईल, अशी घोषणा केली होती.

प्रल्हाद पटेल यांनी शहरातील रेल्वे स्टेशनला देखील भेट दिली. येथील प्लॅटफॉर्मवर एक टपरी आहे. याच टपरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबीमुळे लहानपणी चहा विकला होता. खुद्द मोदींनी या टपरीचा अनेकदा उल्लेख केला आहे.

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींच्या चहा विक्रीवरुन त्यांच्यावर टिका केली होती. अय्यर यांची टिका भाजपच्या जिव्हारी लागले होते. त्यानंतर भाजपने त्यांच्या वक्तव्याचा कडाडून विरोध केला होता. तसेच 'चाय पे चर्चा' हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पर्यटनमंत्री पटेल यांनी ही टपरी वाचविण्यासाठी काचाने सुरक्षीत ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच टपरी आहे तशीच ठेवण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. त्यानुसार, सध्या ही टपरी काचेच्या आवरणात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

नरेंद्र मोदींच्या चहा विकण्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर अनेकदा टीकाही केली आहे. मात्र, खरंच नरेंद्र मोदी चहा विकायचे की नाही, याबाबत त्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी यापूर्वी सांगितले आहे.

वडनगर रेल्वे स्टेशनवर वडिलोपार्जित आमचे दोन कँटीन होते. एक स्टेशनवर आणि दुसरे स्टेशनच्या बाहेर होते. याठिकाणी नरेंद्र मोदी यांच्यासह आम्ही सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी येत होतो आणि चहा विकण्याचे काम करत होतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चहाच्या मुद्द्यावरुन केलेल्या टिकेला सकारात्मक घेत, एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो हे जगाला दाखवून दिलं.