देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 17:46 IST2025-10-28T17:41:59+5:302025-10-28T17:46:53+5:30

आतापर्यंत BSF मध्ये फक्त विदेशी कुत्र्यांना सामील केले जायचे; आता पहिल्यांदाच दोन भारतीय श्वानप्रजाती पथकात सामील झाल्या आहेत.

भारतीय सीमा सुरक्षा दलात (BSF) विदेशीसह देशी श्वान प्रजातींची एन्ट्री झाली आहे. बीएसएफने पहिल्यांदाच दोन भारतीय श्वानप्रजाती 'रामपूर हाउंड' आणि 'मुधोळ हाउंड' आपल्या ऑपरेशनल पथकात सामील केले आहेत. हे देशी योद्धे केवळ गस्त किंवा चौकीदारीपुरते मर्यादित नाहीत, तर आता हे खरे ‘कमांडो डॉग्स’ बनले आहेत. आव्हानात्मक मोहिमांमध्ये या कुत्र्यांना प्रत्यक्ष सहभागी केले जात आहे.

सीमांवर आता देशी श्वानांची तीक्ष्ण नजर- आतापर्यंत सीमा रक्षणासाठी डोबर्मन, बेल्जियन शेफर्ड, जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर यांसारख्या विदेशी श्वानांवर अवलंबून राहावे लागत होते. पण आता भारतीय हवामान आणि भूप्रदेशाशी जुळवून घेणाऱ्या देशी प्रजातींना यात सामील केले आहे. बीएसएफने सध्या 150 हून अधिक भारतीय श्वानांना पश्चिम व पूर्व सीमांवर, तसेच नक्षलप्रभावित भागात तैनात केले आहे.

टेकनपूरमध्ये कमांडो ट्रेनिंग- मध्य प्रदेशातील टेकनपूर येथील नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्स (NTCD) मध्ये या दोन्ही प्रजातींना विशेष कमांडो प्रशिक्षण दिले जात आहे. हेलिकॉप्टरवर स्लिदरिंग, रिव्हर राफ्टिंग, जंगलात ट्रॅकिंग आणि सर्च ऑपरेशन यांसारख्या कठीण सरावांचा समावेश आहे. बीएसएफ अधिकारी सांगतात की, “पहिल्यांदाच डझनभर देशी श्वानांना कमांडो ऑपरेशन्ससाठी तयार केले जात आहे. हे श्वान थेट हेलिकॉप्टरमधून युद्धक्षेत्रात उतरतील.”

मुधोळ हाउंड - कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ संस्थानचे राजा मलोजीराव घोरपडे यांनी तयार केलेली ही प्रजाती कधी काळी भारतीय राजांच्या सेनेचा भाग होती. राजा जॉर्ज पंचम यांनाही या प्रजातीचा कुत्रा भेट दिला होता. त्यानंतरच या श्वानाला “मुधोळ हाउंड” हे नाव मिळाले. याचा वेग, दृष्टी आणि वास घेण्याची क्षमता अद्भुत आहे. 2016 मध्ये भारतीय सैन्याने मेरठच्या RVC सेंटरमध्ये प्रथमच मुधोल हाउंडला प्रशिक्षण दिले.

रामपूर हाउंड - रामपूर (उत्तर प्रदेश) येथील नवाबांनी सुमारे 300 वर्षांपूर्वी अफगाण हाउंड आणि इंग्लिश ग्रेहाउंड यांच्या संकरातून ही प्रजाती विकसित केली. पूर्वी शिकारीसाठी प्रसिद्ध असलेला हा श्वान आता सीमासुरक्षेचा पहारेकरी बनला आहे. हा 40 मैल प्रती तास वेगाने धावू शकतो. त्याची ताकद, शिस्त आणि निडरता यामुळे तो पर्वतीय आणि वाळवंटी भागात गस्तीसाठी आदर्श ठरतो.